गारपीट रकमेत गैरव्यवहार
By Admin | Updated: February 2, 2016 01:09 IST2016-02-02T01:09:44+5:302016-02-02T01:09:44+5:30
मार्च २०१४ मध्ये गारपिटीमध्ये लासुर्णे (ता. इंदापूर) गावात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शासनाने या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला

गारपीट रकमेत गैरव्यवहार
लासुर्णे : मार्च २०१४ मध्ये गारपिटीमध्ये लासुर्णे (ता. इंदापूर) गावात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शासनाने या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला. परंतु, लासुर्णे गावात या गारपिटीच्या नुकसानभरपाईच्या मदतीत गैरव्यवहार झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.
लासुर्णेतील आरटीआय कार्यकर्ते पंकज निंबाळकर यांनी इंदापूरच्या तहसीलदारांकडे सबळ पुराव्यासह प्रकरण २२ मे २०१५ रोजी दाखल केले. आठ महिने उलटले तरीही गारपीट नुकसानभरपाईच्या गैरव्यवहारातील अधिकारी मोकाट आहेत. इंदापूरचे तहसीलदार चौकशीसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते निंबाळकर यांनी केला आहे.
येथील गावात गारपिटीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. गारपिटीच्या नुकसानभरपाईच्या मदतीत गैरव्यवहार केल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. यामध्ये शासकीय नियमानुसार हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात येते. अनेकांना ३० गुंठे क्षेत्राला ४५ ते ४८ हजार रुपये मदत म्हणून वाटण्यात आले. आठ ‘अ’ क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर वाटप केले गेले आहे. पंचनामे करताना भुसार पिकाऐवजी फळबागा दाखविल्या गेल्या.
खरे नुकसान झाल्ोल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच दिली गेली नाही. काही शेतकऱ्यांना एकाच पिकासाठी दोन वेळा नुकसानभरपाई दिली गेली. या पंचनाम्याची कोठेही आवक-जावकची नोंद दिसून येत नाही. काही शेतकऱ्यांची नमूद केलेली खाती नसतानाही नुकसानभरपाई काढली गेली आहे.
तलाठी व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मदतीत गैरव्यवहार झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे,असा निंबाळकर यांचा आरोप आहे. तक्रार करूनही भरपाईच्या वाटपात गैरव्यवहार करणारे कर्मचारी मोकाट आहेत.