पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चा वासापूजन कार्यक्रम रविवारी (दि.२७) पश्चिम विभागाचे अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या हस्ते पार पडला. या उपक्रमाने उत्सवाचा ‘श्रीगणेशा’ करण्यात आला.
याप्रसंगी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे सुनील रासने, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, छत्रपती राजाराम मंडळाचे अरुण गवळे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे, पोलिस निरीक्षक प्रशांत भुरुमे, संतोष पांढरे, अरुण घोडके आदी उपस्थित होते.
अपर पोलिस आयुक्त बनसोडे म्हणाले की, हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेश मंडळाच्या वासापूजनाचा मान दिल्याबद्दल मी ट्रस्टचा आभारी आहे. गणेशोत्सवाची आता सुरुवात होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होईल, त्यासाठी रंगारी ट्रस्टसह सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची आम्हाला मदत होईल, असा विश्वास आहे. वासापूजन सोहळ्यापूर्वी रंगारी भवनात बाप्पाची आरती झाली. यावेळी शिवमुद्रा ढोलताशा पथकाने केलेल्या वादनाने उपस्थित गणेशभक्तांची मने जिंकली.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वासापूजन सोहळ्याने गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. यंदा आम्ही रत्नमहल हा देखावा साकारणार आहोत. या महलमध्ये भारतातील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि मोती यांचा मिलाप असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रथाला बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला असून, तो यावर्षीही कायम असणार आहे. - पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त