बनावट कागदपत्रांद्वारे गाड्यांची विक्री करणारी टोळी जेरबंद; स्वारगेट पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:41 PM2024-03-22T12:41:51+5:302024-03-22T12:42:18+5:30

तिघा आरोपींनी आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून १५ ते १७ वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करून लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे...

Gang jailed for selling cars with forged documents; Action of Swargate Police | बनावट कागदपत्रांद्वारे गाड्यांची विक्री करणारी टोळी जेरबंद; स्वारगेट पोलिसांची कारवाई

बनावट कागदपत्रांद्वारे गाड्यांची विक्री करणारी टोळी जेरबंद; स्वारगेट पोलिसांची कारवाई

पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे चारचाकी गाड्यांची विक्री करणाऱ्या टोळीला स्वारगेटपोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून ३६ लाख रुपये किमतीची सहा चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. आयुष अभय कुलथे (२५, रा. रहाटणी, पिंपरी), सुजित भाईदास बडगुजर (२६, रा. झील चौकाजवळ, नर्हेगाव), प्रथमेश संतोष शेटे (२२, रा. गुरुद्वारा चौकाजवळ, आकुर्डी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तिघा आरोपींनी आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून १५ ते १७ वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करून लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

गणेश जगदाळे (२८, रा. परांडा, जि. धाराशिव) यांची २५ मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्वारगेट बसस्थानक परिसरात आयुष कुलथे याने त्याचे नाव नवनाथ खजिने असे खोटे सांगितले. तसेच त्याच्या नावाने गाडीची खोटी कागदपत्रे तयार करून आपल्या इतर साथीदारांना सोबत घेऊन जगदाळे यांना तीन लाख रुपये घेऊन विक्री केली होती. मात्र, ती गाडी आरोपीने एका व्यक्तीकडून भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतली होती. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जगदाळे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी या टोळीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

दरम्यान, पोलिस अंमलदार संदीप घुले, अनीस शेख आणि शिवा गायकवाड यांना या टोळीची माहिती मिळाली. त्यानुसार तिघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या इतर फरार साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी, वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलपगारे, गुन्हे निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, कर्मचारी सुजय पवार, सोमनाथ कांबळे, दीपक खेंदाड, फिरोज शेख, प्रवीण गोडसे यांच्या पथकाने केली.

असे करायचे गाड्या लंपास :

आयुष कुथले हा टोळीप्रमुख आहे. तो आपल्या इतर साथीदारांना सोबत घेऊन गाड्या भाड्याने देणाऱ्या संकेतस्थळावरून गाड्या घेत असे. तसेच भाडेतत्त्वावर गाड्या चालवण्यासाठी घेतो, असे सांगून गाड्या आणत असे. त्यानंतर त्यांची बनावट कागदपत्रे तयार करत असे. पुढे त्या गाड्या व्याजाने पैसे घेण्यासाठी सावकारांकडे गहाण ठेवत असे किंवा पैसे आले की विक्री करून टाकत होता.

Web Title: Gang jailed for selling cars with forged documents; Action of Swargate Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.