कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:33+5:302021-07-07T04:12:33+5:30
चाकण : चाकण एमआयडीसीतील कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीतील एचपी पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या पेट्रोल पंपाजवळ सहा दिवसांपूर्वी तेवीस वर्षीय ...

कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटणारी टोळी जेरबंद
चाकण : चाकण एमआयडीसीतील कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीतील एचपी पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या पेट्रोल पंपाजवळ सहा दिवसांपूर्वी तेवीस वर्षीय तरुणास शिवीगाळ, दमदाटी करत कोयत्याचा धाक दाखवून व त्याला जबर मारहाण करत लुटणारी टोळी सोमवारी (दि. ५ जुलै) जेरबंद करण्यात आली. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हा प्रकार बुधवारी (दि. ३० जून) मध्यरात्री घडला होता. तेव्हापासून पोलीस चोरट्यांचा शोध घेत होते. चाकण पोलिस ठाण्यात याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रमोद बाबूराव कांबळे (वय २३, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार येथील पोलिसांनी त्याचा रात्री उशिरा पाच अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलीस भामट्यांचा शोध घेत होते. सोमवारी या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. युवराज अश्रुबा रोडे व विष्णू आनंदा नरवडे (दोघेही रा. सोनवणेवस्ती, कुरुळी, ता. खेड,) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर तीन अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. यातील विष्णू नरवडे अट्टल चोरटा असून, त्याच्यावर खेड तालुक्यातील चाकण व आळंदी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
अधिक वृत्त असे की, प्रमोद कांबळे हा बुधवारी (दि. ३० जून) मध्यरात्री बारा वाजण्याच्या दरम्यान कुरुळी येथील एचपी पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या गेस्ट हाऊस जवळून पायी जात होता. त्यावेळी डोंगर भागातून आलेल्या वरील पाच जणांनी संगनमताने कांबळे यांची गचांडी पकडून शिवीगाळ, दमदाटी करत त्यास हाताने, लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. एक काचेची बाटली देखील कांबळे यांच्या कानफाटावर फेकून मारल्याने ते गंभीर जखमी झाले होते. लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून त्यास जिवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्या जवळील अडतीस हजार रुपयांचे दोन महागडे मोबाईल चोरून पोबारा केला होता. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळीग व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.