गणेश बिडकर यांनी पुणेकरांची मागावी माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:14+5:302021-05-15T04:09:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य सरकार कोरोना लसींसाठी जागतिक निविदेची परवानगी देत नाही हा राज्य सरकारवरचा आरोप सपशेल ...

गणेश बिडकर यांनी पुणेकरांची मागावी माफी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सरकार कोरोना लसींसाठी जागतिक निविदेची परवानगी देत नाही हा राज्य सरकारवरचा आरोप सपशेल खोटा आहे. त्यामुळे आता हा आरोप करणाऱ्या भाजपच्या गणेश बिडकर यांनी पुणेकरांची माफी मागावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली.
राज्य सरकारने सक्षम स्थानिक स्वराज संस्थांना अशी निविदा काढण्याला कधीचीच परवानगी दिली आहे. शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच बिडकर यांना वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी ते सांगितले. त्याचवेळी बिडकरांचे अज्ञान उघड होऊन भाजपकडून कोरोनाच्या लसींचा वापर राजकारणासाठी केला जातोय हे सिद्ध झाले, अशी टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रमेश बागवे, संजय मोरे यांनी पवार यांची भेट झाल्यावर पत्रकारांशी बोलताना भाजपला लक्ष्य केले. मोहन जोशी, शाम देशपांडे, प्रशांत बधे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भाजपने पुणे शहरात सर्व लसीकरण केंद्रे ताब्यात घेतली आहेत. तिथे स्वतःचे आणि पक्षाचे नाव व झेंडे लावले. राज्य सरकार लशींचा पुरवठा सकाळी करते व महापौर त्याचे वाटप रात्रीच करतात. त्यांचे नगरसेवक टोकन वाटतात, त्यामुळे पहाटेपासून रांगेत ताटकळत थांबलेल्यांची निराशा होतेय. या सर्व गोष्टी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या निदर्शनास आणल्या. त्यांंनी दखल घेतली नाही त्यामुळे आज अजित पवार यांना सांगितले असे जगताप, बागवे, मोरे यांंनी सांगितले. त्यांनी याची दखल घेत प्रशासनाला राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नये म्हणून बजावले असल्याची माहिती जगताप यांनी दिली.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील कोरोनासारख्या महामारीचा वापर राजकारणासाठी करून पुणेकरांच्या जीवाशी खेळत आहेत, असा आरोप मोहन जोशी यांनी केला.
लस वितरणाची सर्व जबाबदारी कॉल सेंटर स्थापन करून त्यांच्याकडे द्या, टोकन पद्धत बंद करा, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केल्याचे तिन्ही शहराध्यक्षांनी स्पष्ट केले.
---
बिडकरांनी आपले अज्ञान आपल्याजवळच ठेवावे
पुण्यात २५ लाख लशींची गरज आहे. महापालिकेने आता या लशींसाठी जागतिक निविदा जाहीर करावी व पुणेकरांंना दिलासा द्यावा व या पुढे बिडकरांनी आपले अज्ञान आपल्याजवळच ठेवावे, जाहीर करू नये, अशी मागणी तिन्ही शहरप्रमुखांनी केली.