गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका-कवयित्री सानिया यांना जाहीर

By नम्रता फडणीस | Published: November 23, 2023 06:14 PM2023-11-23T18:14:12+5:302023-11-23T18:14:38+5:30

विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या पत्नी अपर्णा अभ्यंकर यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर

Gadima award announced to senior writer poet Sania | गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका-कवयित्री सानिया यांना जाहीर

गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका-कवयित्री सानिया यांना जाहीर

पुणे : गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ लेखिका-कवयित्री सानिया यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या पत्नी अपर्णा अभ्यंकर यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध कवी-गीतकार वैभव जोशी यांना चैत्रबन पुरस्कार आणि युवा गायिका स्वरदा गोखले-गोडबोले यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त १४ डिसेंबर रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात गदिमांचे स्नेही आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी गुरुवारी दिली. प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे आणि राम कोल्हटकर या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात आनंद माडगूळकर लिखित ‘गदिमा-बाबूजी : एक अद्वैत’ व ‘गदिमांची पंचवटी आणि आम्ही सात भावंड’ या सुरेश एजन्सीने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे गदिमांचे बंधू डाॅ. अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

Web Title: Gadima award announced to senior writer poet Sania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.