लोकगीते, पारंपरिक गाण्यांना फ्युजनचा तडका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:11 PM2018-12-05T13:11:54+5:302018-12-05T13:18:42+5:30

बॉलीवूड, हॉलीवूडमधील गाण्यांचा समावेश करतानाच लोकगीते, अभंग, संत कबीरांचे दोहे यांसह सुफी संगीतालाही म्युझिक बँडसमध्ये स्थान मिळाले असून, अशी गाणी हिट होत आहेत.

fusion touch to folks and traditional songs | लोकगीते, पारंपरिक गाण्यांना फ्युजनचा तडका

लोकगीते, पारंपरिक गाण्यांना फ्युजनचा तडका

googlenewsNext
ठळक मुद्देबँडसची धूम : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवला झेंडा म्युझिक बँडसच्या लाईव्ह कार्यक्रमांनाही तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसादपुण्यात बँड कल्चर जोराने फोफावत आहे. बरेच आयोजक लाईव्ह बँडचे शो आयोजित

प्रज्ञा केळकर-सिंग 
पुणे : उडत्या चालीच्या गाण्यांवर थिरकणारी पावले...लोकगीते, पारंपरिक गाण्यांना मिळालेला फ्युजनचा तडका...गाण्यांतील ‘बीटस’ वर तरुणाईने धरलेला ठेका...ड्रम, गिटार, कीबोर्ड या वाद्यांनी वातावरणात भरलेले रंग...कराओकेमधून सादर होणारे नादमधूर संगीत...अशा वातावरणातील म्युझिक बँडसची धूम सध्या पुण्यात ट्रेंडी ठरत आहे. पुण्यातील अनेक बँडसनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवले आहे. बॉलीवूड, हॉलीवूडमधील गाण्यांचा समावेश करतानाच लोकगीते, अभंग, संत कबीरांचे दोहे यांसह सुफी संगीतालाही म्युझिक बँडसमध्ये स्थान मिळाले असून, अशी गाणी हिट होत आहेत. ‘बिना झोली का फकीर’, ‘गो क्राय टू युअर मदर’, ‘ख्वाब’ अशी गाणी लोकप्रिय होत आहेत.
सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाफ पहायला मिळतो. शास्त्रीय संगीताचे महोत्सव रसिक उचलून धरतात, त्याचप्रमाणे म्युझिक बँडसच्या लाईव्ह कार्यक्रमांनाही तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो. अनेक कार्यक्रम, उत्सवांमध्ये संयोजकांकडून बँडसना पाचारण केले जाते. डेड एक्साल्टेशन, अ‍ॅडमँटियम, किलआऊट, श्वा, मलंग अशा विविध म्युझिक बँडसनी केवळ शहरातच नव्हे, तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहोर उमटवली आहे.
‘म्युझिक बँडमध्ये गायक, गिटारिस्ट, ड्रमर, पर्केशन प्लेयर, कीबोर्ड वादक यांचा समावेश असतो. सध्याच्या काळात लोकांना इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक, बॉलीवूड म्युझिक, फ्युजन जास्त आपलेसे वाटते. इतर वेळी घरी बसून अथवा कारमध्ये ऐकले जाणारे संगीत बँडच्या सादरीकरणात ऐकायला मिळत नाही. मेटल, जॅझ, पॉप, क्लासिकल फ्युजन, फोक साँग फ्युजन, रॉक अँड रोल अशा प्रकारचे संगीत वातावरणात रंग भरते आणि तरुणाईला खिळवून ठेवते’, अशी माहिती ड्रमर आदित्य ओक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. म्युझिक बँडमध्ये भारतातील विविध राज्यांतून आलेल्या कलाकारांचा समावेश असतो. त्यामुळे त्या त्या राज्यातील संगीताचा प्रकार, तेथील लोकांची आवड आदी जाणून घेऊन सर्वसमावेशक संगीत तयार करण्यावर भर दिला जातो. संगीत हा अभिव्यक्तीचा सर्वात सुंदर मार्ग आहे. संगीताच्या माध्यमातून थेट रसिकांच्या ह्दयापर्यंत पोहोचता येते. त्यामुळे संगीत चिरंतन आहे, असेही आदित्यने सांगितले.
मलंग बँडमधील गणेश वेंकटेश्वरन म्हणाला, ‘पुण्यात बँड कल्चर जोराने फोफावत आहे. बरेच आयोजक लाईव्ह बँडचे शो आयोजित करतात. सध्या लोकांना बॉलीवूड आणि फ्युजन गाण्यांनी भुरळ घातली आहे. बँडमध्ये गिटार, ड्रमप्रमाणेच बासरी, सरोद, संतूर, सतार अशा पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो. यातून संगीतातील माधुर्य आणखी वाढते. बँडसाठी परस्परपूरक काम अत्यंत महत्वाचे असते. कोणती गाणी कशी सादर करायची, लोकांना कशा प्रकारे खिळवून ठेवता येईल, याचा विचारही केला जातो.’
..................
महिला ड्रमर्सची धूम
लाईव्ह बँडमध्ये तरुणींनीही हिरिरीने स्थान मिळवले आहे. अनन्या पाटील, सिध्दी शाह, सुनिधी शर्मा यांच्यासारख्या तरूणींनी बँडमधील आपले अस्तित्व अधोरेखित केले आहे. ड्रमचे पाच पीस वाजवताना लागणारी ताकद, वादनातील लय, सूर आणि ताल यांचा अनोखा मिलाफ... पायाने बेस ड्रम आणि हाय हॅट वाजवतानाच हातांनी साधावा लागणारा समन्वय... वादनासाठी आवश्यक असणारा रियाझ आणि संगीताची साधना अशा वैविध्यपूर्ण अंगांनी विकसित केलेल्या ड्रमवादनाला १५ वर्षीय अनन्याने वेगळी ओळख मिळवून दिली आहे. ‘अनन्य’साधारण ड्रमरबाजीची झलक दाखवत यंदाच्या डमरु फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारी ती एकमेव मुलगी ठरली आहे.
--------
क्लासेसची लोकप्रियता
आपल्या पाल्याने लहानपणापासून एखादे तरी वाद्य शिकावे, अशी पालकांची इच्छा असते. त्यामुळेच तबला, पेटी, सतार यांसारख्या पारंपरिक वाद्यांप्रमाणे कीबोर्ड, ड्रम, गिटार अशी वाद्येही आत्मसात करावीत, असे त्यांना वाटते. त्यामुळेच पुण्यात विविध संगीत संस्थांमध्ये मुलांना लहानपणापासून संगीताचे शिक्षण मिळते. यातून बँड कलाकारांची नवी पिढी घडण्यास हातभार लागत आहे.
 

Web Title: fusion touch to folks and traditional songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.