’फ्युजन’ हे ‘कन्फ्युजन’ होता कामा नये : पं. स्वपन चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 08:52 PM2019-12-21T20:52:54+5:302019-12-21T20:53:23+5:30

वय वर्षे 72. परंतु तालवाद्यावरची जादुई बोटांमधील त्यांची ताकद आणि हुकुमत अजूनही कमी झालेली नाही.....  

Fusion should not be 'confusion': Pt. Swapana Chaudhary | ’फ्युजन’ हे ‘कन्फ्युजन’ होता कामा नये : पं. स्वपन चौधरी

’फ्युजन’ हे ‘कन्फ्युजन’ होता कामा नये : पं. स्वपन चौधरी

googlenewsNext
ठळक मुद्दे‘श्रद्धा सुमन’ मैफलीत शनिवारी (दि.२१) पं. स्वपन चौधरी यांचे सुश्राव्य एकल तबलावादन होणार

भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील  एक उत्तुंग आणि बुजुर्ग ' तालपर्व ' म्हणजे पं. स्वपन चौधरी.  वय वर्षे 72. परंतु तालवाद्यावरची जादुई बोटांमधील त्यांची ताकद आणि हुकुमत अजूनही कमी झालेली नाही.  प्रसिद्ध तबलावादक पं. अरविंदकुमार आजाद आपले गुरू पं. किशन महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ घेत असलेल्या ‘श्रद्धा सुमन’ मैफलीत शनिवारी (दि.२१) पं. स्वपन चौधरी यांचे सुश्राव्य एकल तबलावादन होणार आहे. त्यानिमित्त  ‘लोकमत’ने  साधलेल्या संवादात ‘फ्युजन’ हे खराब नाही. पण  ‘फ्युजन’ हे ‘कन्फ्युजन’ होता कामा नये असा मूलमंत्र त्यांनी नव्या पिढीला दिला आहे. 
----------------- 

नम्रता फडणीस - 

*  कुटुंबात सांगीतिक वातावरण होते का? लखनौ घराण्याची तालीम कशी घेतलीत? 
- मी एका घराण्याकडून तालीम घेतली आहे असे कधी सांगत नाही. माझी सर्व घराण्यावर भक्ती आणि प्रेम आहे. पण आपण घराणी गृहीत धरली आहे. सुरूवातीच्या काळात असं काही नव्हतं. हो पण हे खरं आहे की मी लखनौ घराण्याची तालमी घेतली आहे.  त्याबददल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मात्र माझी तालीम ही कलकत्यामधूनच झाली. कारण लखनौचे खलिफा होते, अब्दुल हुसेन खाँ. ते सहा महिने कलकत्ता आणि सहा महिने लखनौला असायचे. तेव्हापासून लखनौ घराणे कलकत्त्यात आले. माझे गुरू म्हणाल तर ते बँकर होते. मी जेव्हा संगीत शिकण्यास सुरूवात केली. तेव्हा माझ्या कुटुंबात सांगीतिक वातावरण मुळीच नव्हते. माझ्या कु टुंबातले सर्व जण वैद्यकीय क्षेत्रात होते. सर्वांची इच्छा होती की मी देखील डॉक्टर व्हावे. पण मला त्यात प्राविण्य मिळवता आले नाही. मग वादनाकडे वळलो. 
* परंतु, सुरूवातीपासून कल हा वादनाकडेच होता का?
-नाही. उलट माझा कल गाण्याकडे अधिक होता. मी लहानपणापासून गायचो. पण सोळा वर्षांचा असताना टॉन्सिल्समुळे गळा काहीसा खराब झाला. तेव्हापासून तबल्यावर लक्ष्य केंद्रित केले. तरीही मला अजूनही गायला आवडते. आजही मी गातो पण फक्त एकांतात.  
*  संगीताची पहिली मैफल कधी आणि कुणाबरोबर केलीत? त्याविषयीची काही आठवण?
-मी पहिली मैफल 1969 मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्याबरोबर केली. त्यांना भेटायला गेलो तेव्हा अजून  ‘तबलावादन’ करत आहेस का? असे त्यांनी विचारले आणि तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की माझ्या पहिल्या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर वाजवायचे. आकाशवाणीवर हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला. मग प्रसिद्धधी मिळू लागली. ते प्रसिद्धधीचे वलय जेव्हा संपले. तेव्हा हे काय झालं असं वाटल? त्यानंतर आता मेहनत करायला हवं असं वाटलं. संगीत क्षेत्रात जायचं असेल तर  आपण सर्वसामान्य वादक व्हायचं नाही हे मनाशी पक्क ठरवलं. मग अपार कष्ट घेतले. प्रसिद्ध होणं सोपं आहे, पण ते टिकवणं अवघड आहे. आजही म्हणूनच मेहनत घेत आहे. 
* तुम्ही अली अकबर खान, पंडित रवीशंकर यांच्यासारख्या अनेक दिग्गज कलावंताबरोबर मैफीली केल्या आहेत, तो अनुभव कसा होता?
- मी अमीर खॉ, पं.भीमसेन जोशी, पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्याबरोबर देखील मैफिली केल्या आहेत. पण प्रत्येकाबरोबरचा अनुभव अत्यंत वेगळा होता. एकच राग वाजवत असूनही, त्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन हा अत्यंत वेगळा असतो. त्यासाठी खूप संयम आणि लक्ष्य केंद्रित करावं लागतं. अली अकबर खान यांच्याबरोबर वाजवण अवघड होतं. त्यांची मेलोडिक बाजू मजबूत होती. त्यावर ठेका वाजवणं हे गणिती पद्धतीच्या पलीकडचं होतं. तबलावादकासाठी  ‘ऐकणं’ हे जास्त महत्वाचं असतं. कोणत्याही कलाकाराबरोबर साथसंगत करताना तो  कोणत्या दिशेने जाणार आहे हे समजायला हवं. संगतकाराच्या भावनेतून गेलो की ट्युनिंग चांगलं जमतं. या सर्वांकडून वादन कसं करायचं हे शिकायला मिळालं. 
* भारतीय संगीताची ताकद कशात आहे? भारतीय आणि पाश्चात्य संगीतात काय फरक जाणवतो?
- भारतीय अभिजात संगीत हे भावनांवर आधारित आहे. संगीत म्हणजे अभिव्यक्ती आहे, तुमच्या अंत:करणाला जे स्पर्शून जाते, तेच बाहेर पडते. पण पाश्चात्य संगीतात फरक आहे. तिथं केवळ नोटेशन लिहिली जातात. तुम्हाला जे वाटते ते वाजवू शकत नाही. भारतीय संगीत हे उर्जा देणारे आहे. 
* नवीन पिढी तालवाद्यांकडे वळत असली तरी त्यांचा ओढा  ‘फ्युजन’ कडे देखील आहे, त्याविषयी काय वाटत?
-  ‘फ्युजन’ हे खराब नाही. तो पण एक संगीताच्या विषयाचाच एक प्रकार आहे. पण  ‘फ्युजन’ हे ‘कन्फ्युजन’ होता कामा नये. एक बँड बनविला, त्यात एक ड्रमसेट, गिटार आणले.  सगळे आपापल्या परीने वाजवत आहेत पण कुणीच समेवर येत नाहीयेत. अशी स्थिती व्हायला नको. 
* पुण्यात रंगणा-या सांगीतिक मैफलींविषयी काय सांगाल?
- पुणं संगीत क्षेत्रात एक नंबरवर आहे. पन्नास वर्षांपूर्वी कलकत्तामध्ये सांगीतिक वातावरण होते. पण आता सगळं  ‘बॉलिवूड’ झालं आहे. पुण्याची संस्कृती संगीतामुळं श्रीमंत झाली आहे. जगभरात अनेक संस्कृती नष्ट पावल्या पण केवळ  प्राचीन काळापासून केवळ एकच संस्कृती टिकून आहे ती का? याचा विचार पण केला पाहिजे. कारण भारतीय संस्कृतीमध्ये ती ताकद आहे.
---------------------------------------------------------

Web Title: Fusion should not be 'confusion': Pt. Swapana Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.