धूर फवारणीस नागरिकांचा विरोध
By Admin | Updated: September 4, 2015 02:18 IST2015-09-04T02:18:32+5:302015-09-04T02:18:32+5:30
नागरी वस्तीमध्ये डास व कीटकांचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कीटक निर्मूलन शाखेतर्फे बिबवेवाडी परिसरात मशिनद्वारे धुराची फवारणी करण्यात आली

धूर फवारणीस नागरिकांचा विरोध
कात्रज : नागरी वस्तीमध्ये डास व कीटकांचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कीटक निर्मूलन शाखेतर्फे बिबवेवाडी परिसरात मशिनद्वारे धुराची फवारणी करण्यात आली. मात्र, या फवारणीने श्वसनाला त्रास होतो व आरोग्याला तो धोकादायक असल्याचे कारण सांगून नागरिक याला विरोध करीत आहेत. त्यामुळे या विभागाचे कर्मचारी हैराण झाले आहेत.
मुळातच महापालीकडे संपूर्ण शहरासाठी केवळ तीनच धुरफवारणी यंत्रे आहेत. प्रत्येक विभागाला एक दिवस, अशा रीतीने ही यंत्रे काम करीत आहेत. त्यामुळे या विभागाच्या कर्मचाऱ्यांना अगोदरच खूप ताण असतो. अध्ये-मध्ये ही फवारणी यंत्रे बंद पडतात. त्यांच्या दुरुस्तीसाठी मेंटेनन्स करणारा येईपर्यंत थांबावे लागते. त्यातच अनेक नागरिक, सामाजिक संस्था या धूरफवारणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशा अफवा पसरवून या कर्मचाऱ्यांना विरोध करतात. त्यामुळे त्यांना काम करणे मुश्कील बनले आहे.
काही गृहनिर्माण संस्था या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवेश देत नाहीत; त्यामुळे या कर्मचाऱ्यांना काम करण्यास अडथळे निर्माण होतात. डासांमुळे होणारे मलेरिया, डेंगीसारखे रोग होऊ नयेत म्हणून उपाययोजना करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच नागरिक अपशब्द वापरतात. प्रसंगी हाकलूनही देतात. तेव्हा हे कर्मचारी निमूटपणे दुसऱ्या भागात काम करतात, असे दिसून आले आहे. तसेच, पालिका नियमावलीनुसार ज्या घरात, घराच्या आसपास डासांची पैदास होण्यासारखी स्थिती असेल, त्या घरमालकाला ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड करण्याचा अधिकार पालिका कर्मचाऱ्यांना आहे. अशा घरमालकांवर कारवाई करीत असताना ते नागरिक स्थानिक नगरसेवकांना फोन करून या कर्मचाऱ्यांवर दबाव आणतात आणि दंड भरण्यास नकार देतात. तसेच, या कर्मचाऱ्यांना धूरफवारणी करताना तोंडाला मास्क व हँडग्लोव्ह्ज पुरवले जात नाहीत; त्यामुळे या धोक्यामध्ये राहून काम करावे लागते, अशी तक्रार पालिकेचे मलेरिया सर्व्हेे निरीक्षक रोहन चव्हाण यांनी लोकमतला सांगितली. या धूरफवारणी यंत्रासाठी शासनातर्फे पायरेथम नावाचे औषध पुरवले जाते, तसेच साठलेल्या पाण्यावर फवारणीसाठी टेमीफॉस हे औषध पुरवले जाते. यांचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शाकतो; त्यामुळे त्यावर बंदी घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले तरी ही धूरफवारणी व औषधफवारणी सुरू आहे. (वार्ताहर)