कार्यकर्त्यांचा जल्लोष, गुलालाची उधळण
By Admin | Updated: February 24, 2017 02:25 IST2017-02-24T02:25:43+5:302017-02-24T02:25:43+5:30
बारामती मध्ये आज जाहीर झालेल्या जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुक निकालासाठीआज सकाळपासुनच

कार्यकर्त्यांचा जल्लोष, गुलालाची उधळण
बारामती : बारामती मध्ये आज जाहीर झालेल्या जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुक निकालासाठीआज सकाळपासुनच कार्यकर्त्यांंनी गर्दी केली होती. गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आताषबाजीने भर उन्हात देखील कार्यकर्त्यांचा विजयाचा जल्लोष सुरुच होता.
सकाळी ८ वाजल्यापासुनच एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाउनमधील मतमोजणी केंद्राच्या दिशेने कार्यकर्त्यांच्या वाहनांचे ताफे निघाले. ‘गुलाल आमचाच’ असा संदेश देवून कार्यकर्ते विजयोत्सवाच्या तयारीनिशी मतदान केंद्राबाहेर पोहचले. पहिलाच निकाल सुपे गटातील होता. मोजणी सुुरु झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु झाली. निवडणूक प्रचार काळात सुपा-मेडद गटात चुरशीची लढत होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. पहिल्या फेरीतच राष्ट्रवादीचे भरत खैरे यांनी आघाडी मिळविली. दुसऱ्या फेरीत निर्णायक मते मिळवून विजयी मिळविला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोष केला.
त्यानंतर सुरु झालेला राष्ट्रवादीचा जल्लोष निक ाल जाहीर झाल्यानंतर देखील कायम होता. गुलालाची उधळण केल्याने सर्व कार्यकर्ते, रस्ते गुलालाने माखले होते. राष्ट्रवादीच्या एकापाठोपाठ एक विजयाच्या बातम्या बाहेर आल्या. त्या प्रमाणात जल्लोेष देखील वाढला. आवाज कोणाचा, आवाज राष्ट्रवादीचा, राष्ट्रवादीच पुन्हा, अजित पवार झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांचा उत्साह कमी नव्हता. आवडत्या उमेदवाराचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी ढोल ताशाच्या तालावर कार्यकर्त्यांनी ताल धरल्याचे चित्र होते.
एका पाठोपाठ एक गट आणि गणातील निकाल राष्ट्रवादीच्या बाजुने मोठ्या मताधिक्याने लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. फक्त बारामतीचे बोला, बाकी ठिकाणी काय झाले याचे आम्हाला काय करायचे नाही, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते देत होते.
थिरकली तरुणाई!
राष्ट्रवादीचे फडकणारे झेंडे, गुलाल व भंडाऱ्याची उधळण, कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा, बँजोच्या तालावर थिरकणारी तरुणाई असेच काहीसे चित्र आज आंबेगाव तालुक्यात होते.
निकालानंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. मंचर शहरात राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांची मिरवणूक निघाल्यानंतर अपक्ष विजयी उमेदवार राजाराम बाणखेले यांनी पारंपरिक वाद्याच्या साथीत मिरवणूक काढली.
घोडेगाव येथील मतमोजणी केंद्राबाहेर सकाळी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले होते. काहींच्या हातात पक्षाचे झेंडे होते.
निकाल जसजसा जाहीर होईल, तसतसा जल्लोष वाढत होता. निकालानंतर राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. .