पुणे : मागील महिन्यापासून गुलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांना उपचाराच्या खर्चासाठी महापालिकेकडून दिली जाणारी आर्थिक मदत बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयांची अंमलबजावणी १ मार्चपासून केली जाणार आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील नांदेडगाव, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डिएसके विश्व या भागात मागील महिन्यात जीबीएस चे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले होते. महापालिकेकडून या रुग्णांना शहरी गरीब योजनेअंतर्गत २ लाख तर इतर रुग्णांना १ लाखांची मदत देण्यात येत होती. मात्र, या साथीला अटकाव घालण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले आहे. त्यामुळे नवीन बाधित रुग्ण आठवड्यात एखादा सापडतो. याशिवाय या आजाराचे रुग्ण वर्षभर सापडत असल्याने सर्वांनाच मदत देणे शक्य नाही, त्यामुळे असल्याने उपचारासाठीची दिली जाणारी आर्थिक मदत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ मार्च पासून केली जाणार आहे.
३५ रुग्णांना ४९ लाखांची मदत
महापालिकेकडून १४ जानेवारीनंतर या आजाराने बाधित झालेल्या १२ रुग्णांना २४ लाखांची मदत देण्यात आली तर शहरी गरीब योजनेत बसत नसलेल्या २५ रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपयांप्रमाणे २५ लाखांची मदत आतापर्यंत आरोग्य विभागाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.