पाच आमदार आणि एका खासदाराकडून सव्वाचार कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:05+5:302021-05-15T04:09:05+5:30
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुणे शहराला चांगलाच तडाखा बसला आहे. या काळात वैद्यकीय साधन सुविधा वाढविण्यावर मोठ्या प्रमाणावर ...

पाच आमदार आणि एका खासदाराकडून सव्वाचार कोटींचा निधी
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुणे शहराला चांगलाच तडाखा बसला आहे. या काळात वैद्यकीय साधन सुविधा वाढविण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला. आजमितीस शहरात चौदा हजारांहून अधिक खाटांची व्यवस्था उभी केलेली आहे. वैद्यकीय क्षमता वाढविण्यासाठी शहरातील पाच आमदार आणि एका खासदार यांनी जवळपास चार कोटी ३५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने या निधीचा विनियोग केला जाणार आहे.
शहरात कोरोनाचा रुग्णांच्या आकडेवारीत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढ होण्यास सुरुवात झाली. या काळात मोठ्या प्रमाणावर खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. खासगी रुग्णालये तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्येही ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटा मिळणे अवघड झाले होते. या काळात शहरातील आमदार आणि खासदार कुठे आहेत अशी विचारणा होऊ लागली होती. शहराला कोणी वाली आहे की नाही असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले होते. शहारातील काही आमदारांनी त्यांच्या निधीमधील काही रक्कम पालिकेला दिला आहे. यामधून वैद्यकीय साहित्य खरेदी केले जात आहे.
आमदार माधुरी मिसाळ यांनी ३५ लाख, मुक्ता टिळक यांनी एक कोटी, चंद्रकांत पाटील यांनी ९५ लाख, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ लाख तर डॉ. सिद्धार्थ शिरोळे यांनी ९० लाख रुपयांचा निधी दिला आहे. यासोबतच खासदार गिरीश बापट यांनी २५ लाखांचा निधी दिला आहे. या निधीमधून अनुक्रमे पर्वती, कसबा, कोथरूड, शिवाजीनगर मतदार संघातील रुग्णालयातील व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन खाटा वाढविणे, ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर खरेदी करणे आदी कामे सुचविली होती. पालिकेने निविदा प्रक्रिया राबवित ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर, इंजेक्शन, वैद्यकीय उपकरणे आदी साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच काही प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यापुढे पाठविले असून त्यांना इस्टीमेट पाठविले आहे. लवकरच या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची आशा असून अन्य साहित्याची खरेदी केली जाणार आहे.