पुणे : पुण्यात मेट्रो जमिनीवरून की भुयारी याविषयीचा घोळ संपला नसल्याने मेट्रो मार्गाची आखणी अद्याप अंतिम केलेली नसल्याचे प्रारुप आराखड्याच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. एका बाजूला मेट्रो प्रकल्प अधांतरी असताना प्रारुप आराखड्याच्या अहवालात मेट्रोच्या नावाखाली संपूर्ण शहरासाठी वाढीव ३ चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) एक्स्प्रेस सुसाट सोडण्यात आली आहे. पुण्याचा मेट्रो प्रकल्प अधांतरी असताना सुमारे ३२ किलोमीटर मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला ५०० मीटरपर्यंत ४ ‘एफएसआय’ देण्याची तरतूद जुन्या हद्दीच्या मूळ प्रारुप आराखड्यात करण्यात आली होती. त्यासाठी नागरिकांना वाढीव एफएसआय वापरण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे प्रारुप आराखड्यातील मेट्रोभोवतीच्या ४ एफएसआयवर हजारोने हरकती-सूचना दाखल झाल्या होत्या. दरम्यान, पालिका प्रतिनिधी व तज्ज्ञ सदस्यांच्या नियोजन समितीने प्रारुप आराखड्यावरील ८७ हजार हरकती-सूचनांवर सुनावणी घेऊन अहवाल मुख्य सभेत नुकताच सादर केला आहे. त्या वेळी मेट्रो मार्गिकेभोवती ४ ऐवजी संपूर्ण शहरात ३ एफएसआय देण्याची शिफारस समितीने केली आहे. त्यामुळे शहरात वाढीव एफएसआयचा पूर वाहणार आहे. मात्र, नव्याने निर्माण होणारा २४० कोटी चौरस फुटांचा एफएसआयचा वापर करण्याची क्षमता संपूर्ण शहराची आहे का? तेवढ्या मूलभूत सुविधा उपलब्ध होणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या एफएसआयमुळे बिल्डरांचे कल्याण होणार असून, मेट्रो मात्र कागदावरच राहण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
मेट्रोच्या नावाखाली ‘एफएसआय’ एक्स्प्रेस
By admin | Updated: February 25, 2015 00:44 IST