'लक्झरीयस कार' खरेदी योजनेतून आकर्षक परताव्याच्या अमिषाने पुण्यात तरुणांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 19:38 IST2021-02-12T19:36:32+5:302021-02-12T19:38:35+5:30
स्वतःची लक्झरीयस कार घ्या व आकर्षक परतावा मिळवा अशा जाहिरात केली होती.

'लक्झरीयस कार' खरेदी योजनेतून आकर्षक परताव्याच्या अमिषाने पुण्यात तरुणांची फसवणूक
धनकवडी : स्वतःची लक्झरीयस कार घ्या व आकर्षक परतावा मिळवा अशा जाहिरातीखाली पुण्यातील ए.जे.रॉयल्स प्रा.लि.या कंपनीने बक्कळ परताव्याचे आश्वासन देवून शेकडो तरुणांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. या बोगस कंपनीवर कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रशक्ती संघटनेने केली आहे.
धनकवडी येथील के.के. मार्केट या व्यापारी संकुलात कार्यरत असलेल्या संस्थेच्या कारभाराबाबत संशय आलेल्या युवकांनी राष्ट्रशक्ती संघटनेकडे तक्रार केली होती. तक्रार आल्यावर संघटनेचे अध्यक्ष माऊली दारवटकर व संघटक पद्माकर कांबळे यांनी डमी ग्राहक बनून कंपनीच्या कार्यालयातून सर्व माहिती घेतली होती. या योजनेबाबत फसवणूकीचा धोका ओळखून संघटनेने तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेला दि.२८ जानेवारी २०२१ रोजी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, या कंपनीच्या संचालकांनी राष्ट्रशक्ती संघटनेच्या कार्यालयास भेट दिली. या योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नांना कंपनीच्या संचालकांनी समाधानकारक उत्तरे दिली नव्हती. मारुती इर्टीगा व ईनोव्हा मोटारीसाठी बुकिंग घेवून या मोटारी पंचतारांकित हॉटेल व मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र तसा कोणताही करारनामा कंपनीने केलेला नव्हता.
ए.जे.रॉयल्स या कंपनीला संघटनेने आपण कोणत्या बँकेत कर्ज करून देणार आहात या प्रश्नावर धारेवर धरले होते. मात्र,अशा कोणत्याही बँकेशी ए.जे.रॉयल्सचा करार झालेला नसल्याचे निदर्शनास येताच ही कंपनी बोगस असल्याचा संशय बळावला. अधिक चौकशी केली असता 'एचडीएफसी' बँकेचे नाव कंपनीने पुढे केले होते. सर्वसामान्य बेरोजगार तरुणांच्या नावावर हे कर्ज घेतले जाणार होते. कंपनी तोट्यात गेली तर या कर्ज प्रकरणाला कंपनी जामीन आहे असा दावा कंपनीने केला होता. सखोल माहिती घेतली असता या कंपनीची तोटा सहन करण्याची क्षमता आढळली नाही. एकूणच ही योजना संशयास्पद असल्याची खात्री पटल्यानंतर संघटनेने आर्थिक गुन्हे शाखेने तत्पर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. युवकांनी या खोट्या आश्वासनाला बळी पडू नये असे आवाहन संघटनेने केले आहे.