आळंदी: अध्यक्षांची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे विश्वस्त मंडळाची सभा बोलावून सभावृत्तांतात संस्थेच्या चिटणीस नेमणुकीबाबत खोटा दस्तऐवज तयार करून, विश्वस्त मंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी आळंदीतील नामवंत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील चार विश्वस्तांवर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. या प्रकारामुळे आळंदीतील नामवंत वारकरी शिक्षण संस्थेतील वाद उफाळून आला आहे.
दिनकर बालाजी भुकेले (रा. शिवाजीनगर, पुणे), सुखदेव शिवाजीराव पवार पाटील (रा. आळंदी देवाची), सुरेश गोपाळराव गरसोळे (रा. एरंडवणे, पुणे), बद्रीनाथ किसनराव देशमुख (रा. शेवगाव, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या चौघांनीच अध्यक्षांची परवानगी न घेता मिटींग बोलावून चिटणीस पदावर सुखदेव शिवाजीराव पवार यांची नियमबाह्य नेमणूक केली. खोटे शिक्के, खोटे दस्तऐवज तयार केले, असे संस्थेचे अध्यक्ष संदीपान जनार्धन शिंदे (वय ७४, रा. आळंदी देवाची, ता. खेड, पुणे. मूळ रा. उस्मानाबाद) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संबंधित वारकरी संस्था १९१७ पासून कार्यरत आहेत. राज्यतील अनेक कीर्तनकार व प्रवचनकार याठिकाणी आध्यात्मिक शिक्षण घेत आहेत. दरम्यान, अशा प्रकारांमुळे संस्थेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.