चार मराठी तरुण एनडीएच्या १४६व्या तुकडीत होणार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:32+5:302021-09-02T04:25:32+5:30
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४६व्या तुकडीसाठी झालेल्या परीक्षेत उत्तम कामगिरी करून चार मराठी तरुण पात्र ठरले आहेत. त्यात ...

चार मराठी तरुण एनडीएच्या १४६व्या तुकडीत होणार दाखल
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४६व्या तुकडीसाठी झालेल्या परीक्षेत उत्तम कामगिरी करून चार मराठी तरुण पात्र ठरले आहेत. त्यात पुण्यातील दोन तरुणांचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) जाहीर केलेल्या निकालात शार्दूल कांबळे (पुणे), मयूर ढाकणे (पुणे), संकल्प चौधरी (भुसावळ) आणि अभिषेक गाडे (रिसोड-वाशीम) या चार मराठी तरुणांचा समावेश आहे. या चौघांनी संपूर्ण भारतात अनुक्रमे १९०, १९९, ३४४ आणि ३४७ वा क्रमांक मिळवला आहे.
या सर्व तरुणांनी निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर यांचे मार्गदर्शन घेतले. हे सर्व तरुण सप्टेंबरमध्ये एनडीएमध्ये दाखल होतील. शार्दूल कांबळे आणि मयूर ढाकणे यांची निवड हवाईदलासाठी झाली आहे. तर संकल्प चौधरी व अभिषेक गाडे यांनी निवड सेनादलासाठी झाली आहे. पुण्यात धनकवडी येथे राहणाऱ्या शार्दूल कांबळे याने दहावी सीबीएसई परीक्षेत ८५.६ टक्के (२०१९) गुण मिळवले आहेत. बारावीत त्याने ८२.५ टक्के (२०२१) गुण मिळवले. शार्दूलने अॅपेक्स करिअर्स अकादमीमध्ये एनडीएची तयारी केली. तो म्हणाला की, अकादमीत दोन वर्षांचे प्रशिक्षण घेतल्याने त्याचा खूप फायदा झाला. एसएसबी मुलाखतीसाठी कर्नल ब्राह्मणकर, हृषिकेश आपटे यांच्या मार्गदर्शनाला फायदा झाला.
पुण्यात सांगवी येथे राहणारा मयूर ढाकणे याने सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत ९३.२ टक्के (२०१८) मिळवले. बारावीत त्याने ७९.२ टक्के गुण मिळवले. तो म्हणाला, मी चार महिन्यांचा लेखी परीक्षेच्या कोचिंगचा क्लास सुरू केला. त्याचा फायदा झाल्याचे त्याने सांगितले. संकल्प चौधरी याने भुसावळमध्ये शिक्षण घेतले. दहावीत सीबीएसईच्या परीक्षेत त्याने ८२.२ टक्के (२०१८) गुण मिळवले. बारावीत त्याने ७९.२३ टक्के (२०२०) गुण मिळवले. वाशीम येथे राहणाऱ्या अभिषेक गाडे याने दहावीत ९७ टक्के (२०१८) गुण मिळवले. बारावीत त्याने ८१.०८ टक्के (२०२०) गुण मिळवले.
अॅपेक्स करिअर्सचे संचालक लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त) म्हणाले की, राज्यातून अधिकाधिक तरुणांची एनडीएमध्ये निवड होत असल्याने आनंद होत आहे. पुढील काळात राज्याचा एनडीएमधील टक्का आणखी वाढेल अशा विश्वास वाटतो.
फोटो - शार्दूल कांबळे १, मयूर ढाकणे २ , संकल्प चौधरी ३, अभिषेक गाडे ४