मॅरेथॉन पुढे ढकला
By Admin | Updated: December 5, 2015 09:10 IST2015-12-05T09:10:38+5:302015-12-05T09:10:38+5:30
६ डिसेंबरच्या दिवशी पोलिसांना दोन महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागतो. या घटना संवेदनशील असल्यामुळे देशभरात हाय अलर्ट असतो.

मॅरेथॉन पुढे ढकला
पुणे : ६ डिसेंबरच्या दिवशी पोलिसांना दोन महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागतो. या घटना संवेदनशील असल्यामुळे देशभरात हाय अलर्ट असतो. त्यामुळे पोलिसांनी मॅरेथॉन पुढे ढकलण्याची विनंती आयोजकांना केल्याची माहिती सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिली. यासोबतच मागील दोन वर्षांच्या बंदोबस्ताचे तब्बल ३८ लाख रुपये आयोजकांनी अद्याप पोलिसांना दिले नसल्याचेही रामानंद यांनी स्पष्ट केले.
पुणे मॅरेथॉन स्पर्धेला परवानगी देण्यासाठी पोलिसांना अर्ज देण्यात आला आहे. परंतु पोलिसांनी अद्याप या स्पर्धेला परवानगी दिलेली नाही. ही स्पर्धा शासकीय नसून खासगी आहे. अन्य कार्यक्रमांना तसेच खासगी कामांसाठी पोलिसांनी बंदोबस्त दिल्यास त्याचे पैसे आकारण्यात येतात. त्यामुळे आयोजकांनी बंदोबस्ताचे पैसे दिले पाहिजेत अशी पोलिसांची भूमिका असल्याचेही रामानंद यांनी सांगितले. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि बाबरी मस्जिद पाडल्याची घटनाही याच दिवशी घडलेली असल्यामुळे सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तामध्ये व्यस्त असणार आहेत.
रस्ते महापालिकेच्या मालकीचे असले तरी कायदा सुव्यवस्था, मॅरेथॉनमध्ये रस्त्यांवर, वळणांवर बंदोबस्त देण्यासोबतच वाहतूक वळवण्यापासून अनेक कामे पोलिसांना करावी लागतात. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली असून, स्पर्धेला परवानगी देण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचेही रामानंद या वेळी म्हणाले.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेली पुणे मॅरेथॉन ही दर वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी भरवली जाते. ती आंतरराष्ट्रीय कॅलेंडरनुसार आहे. त्यामुळे पोलिसांची भूमिका योग्य नाही. पोलिसांकडून मॅरेथॉनसाठी ३८ लाखांच्या बंदोबस्ताची थकबाकीही मागण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात दहा दिवसांपूर्वीच हा अर्ज करण्यात आला तेव्हाच पोलिसांकडून बंदोबस्ताच्या निधीबाबत मागणी केली असती तर स्पर्धेबाबत निर्णय घेतला असता, शेवटच्या क्षणी, अशी मागणी करणे योग्य नाही.
- अभय छाजेड, पुणे मॅरेथॉन आयोजन समिती सदस्य