बासरी-व्हायोलिनच्या सुरावटीने चैतन्य

By Admin | Updated: December 11, 2015 00:58 IST2015-12-11T00:58:04+5:302015-12-11T00:58:04+5:30

सनईची मधुर सुरावट, सावनी कुलकर्णी आणि शिल्पा पुणतांबेकर या भगिनींचे अप्रतिम सादरीकरण, रंगलेली जुगलबंदी, तर पं. विश्वनाथ यांनी संगीतक्षेत्रातील अनुभवाच्या शिदोरीवर बंदिशी सादर करून

Flute-violin's Superior Chaitanya | बासरी-व्हायोलिनच्या सुरावटीने चैतन्य

बासरी-व्हायोलिनच्या सुरावटीने चैतन्य

पुणे : सनईची मधुर सुरावट, सावनी कुलकर्णी आणि शिल्पा पुणतांबेकर या भगिनींचे अप्रतिम सादरीकरण, रंगलेली जुगलबंदी, तर पं. विश्वनाथ यांनी संगीतक्षेत्रातील अनुभवाच्या शिदोरीवर बंदिशी सादर करून महोत्सवाची रंगत वाढविली. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा उत्तरार्ध रूपक कुलकर्णी आणि प्रवीण शेलोलिकर यांच्या बासरी आणि व्हायोलिनच्या जुगलबंदीने रंगला. बासरी आणि व्हायोलिनच्या सुरावटीने रसिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. तर, पं. राजन-साजन मिश्रा यांच्या श्रवणीय गायनाचा रसिकांनी पुन्हा नव्याने अनुभव घेतला.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६३व्या सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाला दिमाखदार सुरुवात झाली. नम्रता गायकवाड हिने पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीस अभिवादन करून सुरेल सनईवादन सादर केले. तिने पेश केलेल्या मधुवंती रागाने सर्वांची मने जिंकली. पे्ररणा गायकवाड (सूर सनई), सीमा गायकवाड (सनई), हरदीपसिंग सोधी (तबला) यांनी नम्रताच्या सनईवादनाला सुरेख साथसंगत केली.
सवाईरूपी गंगौघामध्ये भास्करबुवा बखले यांच्या पणती शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी कुलकर्णी यांनी कळस चढवला. लहानपणापासून संगीताची साधना करीत आणि घराण्याची परंपरा जपत रागांचा अभ्यास केलेल्या दोन्ही बहिणींनी बखले बुवांच्या बंदिशींची जुगलबंदी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. ‘अरि तेरो तेजोबन’, ‘सुंदर सूर मतवाला’ या बंदिशींमधील मुलतानी रागाचा विस्तार, मांडणी, एकाच विचारातून आणि समजातून केलेली स्वरांची सुरेल मांडणी थक्क करणारी होती. तबल्यावरील विलंबित एकताल आणि दृत तीनतालाने बंदिशींमध्ये अधिकच रंग भरले.
सुधीर दातार यांचा त्या दोघींनी गायलेला तराणा, जगन्नाथराव पुरोहित यांची मारवा रागातील ‘हो पुनीजन मिलकाओ बजाओ’ ही बंदिश, आलापांना मिळालेला रसिकांचा प्रतिसाद यांमुळे ‘सवाई’ची मैफल आणखीनच रंगली. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली संत रामदासांची ‘ताने स्वर रंगवावा’ ही रचना हेही शिल्पा आणि सावनी यांच्या गायनाचे वैशिष्ट्य ठरले. याच अभंगाच्या वेळी माऊली टाकळकर मंचावर आले आणि टाळ्ंयांचा कडकडाट झाला. त्यांनी केलेले टाळवादन आणि संदीप कुलकर्णी यांच्या बासरीवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. चैतन्य कुंटे (हार्मोनियम), समीर पुणतांबेकर (तबला), राजेंद्र दूरकर (पखवाज), संदीप कुलकर्णी (बासरी), मनाली तुंगे, वर्षा सोनावडीकर (तानपुरा) यांनी जुगलबंदीला साथसंगत केली.
कृ. प्र. खाडिलकर यांच्या ‘संगीत स्वयंवर’ संगीत नाटकाच्या शताब्दी वर्षानिमित्त एखादे नाट्यसंगीत सादर करण्याच्या संगीतपे्रमींच्या विनंतीला मान देऊन दोघींनी ‘एकच नयनाला’ हे पहाडी धून असलेले पद गायले. ‘संगीत स्वयंवर’च्या शताब्दी वर्षानिमित्त सवाईत गायला मिळणे हे आपले अहोभाग्य असल्याची भावना सावनीने व्यक्त केली. शिल्पा व सावनी यांच्या जुगलबंदीनंतर किराणा घराण्याचे नामवंत गायक पं. विश्वनाथ यांनी ‘हे मन बावरे’, ‘गुणिजन की संगती करले’ या बंदिशी सादर करून आपल्या गायनाची सुंदर झलक दाखवली. त्यानंतर ठुमरी सादर करीत त्यांनी मैफलीचा प्रवास पुढे नेला. ‘हरि बिन जग अंधारा’ या भजनात त्यांचे सुपुत्र मनुमहाराज यांनीही साथ दिली. मिलिंद कुलकर्णी, पांडुरंग पवार, मोहसीन मिरजकर, वैष्णवी अवधाली यांनी पं. विश्वनाथ यांना साथसंगत केली. (प्रतिनिधी)
> स्वप्न पूर्ण झाले, तरी सवाईत पुन्हा यायला आवडेल : नम्रता गायकवाड
लहानपणापासून सवाई बघत-ऐकत आले आहे. सवाईच्या स्वरमंचावर येता यावे, असे लहानपणापासूनचे स्वप्न होते. स्वप्न पूर्ण तर झाले आहे; भविष्यातही या स्वरमंचावर यायला निश्चित आवडेल, अशा भावना युवा सनईवादक नम्रता गायकवाड हिने व्यक्त केल्या. नम्रताच्या सनईवादनाने गुरुवारी सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाची सुरुवात झाली. सादरीकरणानंतर तिने ‘लोकमत’शी संवाद साधला. सवाईत सादरीणाविषयी जेव्हा पहिला फोन आला त्या वेळी पहिल्यांदा स्वत:वर विश्वासच बसला नाही. इतक्या लहान वयात संधी मिळेल असे वाटले नव्हते; पण संधीचे सोने करायचा निश्चय केला आहे. नव्या जोमाने तयारीला सुरुवात केली. सादरीकरणात कुठलीही कसर राहू नये म्हणून थेट दिल्ली गाठून पं. विजयकुमार, पं. दयाशंकर तसेच संजीव शंकर, अश्विनी शंकर यांच्याकडून सादरीकरण कशा पद्धतीचे असावे, याचे धडे घेतले. त्याचे तंत्र नव्याने आत्मसात केले. सनईवादन गायकी अंगाने सादर करण्याचा प्रयत्न केला.
नम्रता म्हणाली, ‘‘हा स्वरमंच कलाकारांचे मंदिरच आहे. शुद्ध अंत:करणाने प्रत्येक कलाकार या स्वरमंचावर सेवा बजावतो. मीही अंत:करणापासून सादरीकरणाचा प्रयत्न केला. स्वरमंचावर आले तेव्हा नर्व्हस होते; पण सादरीकरण झाल्यानंतर ताण कुठल्याकुठे पळून गेला. हा मंच किती मोठा आहे, हे खऱ्या अर्थान आज कळाले.’’

Web Title: Flute-violin's Superior Chaitanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.