फ्लॉवर, लसणाच्या भावात वाढ
By Admin | Updated: August 3, 2015 04:09 IST2015-08-03T04:09:13+5:302015-08-03T04:09:13+5:30
घाऊक बाजारात फ्लॉवरची आवक घटल्याने भावात रविवारी दुपटीने वाढ झाली. कांदा, लसुण, तोंडली, शेवगा, वालवर, घेवडा, पावटा या फळभाज्यांचे

फ्लॉवर, लसणाच्या भावात वाढ
पुणे : घाऊक बाजारात फ्लॉवरची आवक घटल्याने भावात रविवारी दुपटीने वाढ झाली. कांदा, लसुण, तोंडली, शेवगा, वालवर, घेवडा, पावटा या फळभाज्यांचे भावही वाढले आहेत. पालेभाज्यांची आवक चांगली होत असल्याने भावात फारसा चढ-उतार झाला नाही.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी १६० ते १७० ट्रक शेतमालाची आवक झाली. काही दिवसांपासून पुणे विभागातील विविध भागांत पावसाने हजेरी लावली. तर काही भागात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सध्या बाजारात काही भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे या भाज्यांचे भाव वाढले आहेत. लसणाच्या भावातही सुमारे १०० रुपये वाढ झाली आहे. फ्लॉवरची आवक कमी झाल्याने भावात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे फ्लॉवरचे भाव १५० ते २०० रुपयांपर्यंत पोहचले. तोंडली, वालवर व पावट्याच्या भावात ५० ते ६० रुपये वाढ झाली आहे. शेवग्याच्या भावात सुमारे १५० रुपये तर घेवड्याच्या भावात १०० रुपये वाढ झाली. पडवळ, बीट व मटारच्या भावात ८० ते १०० रुपयांची घट झाली. पालेभाज्यांची आवक नियमितपणे चांगली होत आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव स्थिर राहिले. रविवारी कोथिंबिरची आवक सुमारे दीड लाख जुडी तर मेथीची सुमारे १ लाख जुडी आवक झाली. रविवारी घाऊक बाजारात परराज्यांतून बेळगाव व धारवाड येथून ४ ते ५ टेम्पो मटार, कर्नाटकातून ७ ते ८ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो शेवगा, कर्नाटक, मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची तर इंदूर येथून ५ ते ६ टेम्पो गाजराची आवक झाली. तसेच मध्य प्रदेशातून ३ ते ३.५ हजार गोणी लसूण आणि इंदूर व आग्रा येथून ७० ट्रक बटाट्याची आवक झाली. (प्रतिनिधी)