‘व्हॅलेंटाइन डे’साठी फुलला गुलाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 00:57 IST2016-02-02T00:57:13+5:302016-02-02T00:57:13+5:30
‘व्हॅलेंटाइन डे’ अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी गुलाबाच्या फुलाला मात्र प्रचंड मागणी असते. या दिवशी शहरातून लाखो गुलाबांची विक्री होते.

‘व्हॅलेंटाइन डे’साठी फुलला गुलाब
पिंपरी : ‘व्हॅलेंटाइन डे’ अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी गुलाबाच्या फुलाला मात्र प्रचंड मागणी असते. या दिवशी शहरातून लाखो गुलाबांची विक्री होते. आत्तापासूनच विक्रेत्यांनी विक्रीसाठी तयारी सुरू केली आहे.
शहरातील घाऊक व किरकोळ विक्रेते हे पिंपरी कॅम्पातील फुलबाजारातून फुले खरेदी करतात. पिंपरी फुलबाजारात किमान २५ विक्रेते आहेत. तळेगाव, कामशेत, वडगाव या मावळातील परिसरातून पॉलीहाऊसचा गुलाब पिंपरीत विक्रीसाठी येतो. गतवर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’ला पिंपरीतील प्रत्येक विक्रेत्याकडून हजाराच्या पटीत गुलाबाची विक्री झाली होती. यंदाच्या वर्षी सुद्धा विक्रेत्यांकडून कोणतीही कसर सोडली जात नसल्याचे दिसून येत आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ साठी बाजार सज्ज झाला आहे. विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर मागणी नोंद करून ठेवली आहे. वातानुकूलन यंत्रणेत गुलाब किमान आठ दिवस चांगला राहतो. मागणी जास्त असल्याने नंतर भाववाढ होईल, या उद्देशाने काही विक्रेत्यांनी येत्या आठ दिवसांतच गुलाबाचा साठा करून ठेवायचे नियोजन केले आहे.
सध्या २० गुलाबाची गड्डी १०० ते १२० रुपयांना येते. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या वेळेस या गड्डीचा भाव दुपटीपेक्षा जास्त होतो. यामुळे १० रुपयांना विकला जाणारा गुलाब २० ते ३० रुपयांना सुद्धा विकला जातो. पॅकिंग केलेला गुलाब ३० ते ५० रुपयांना विकला जातो. सर्व गुलाब असलेला बुके २०० ते २५० रुपयाने विक्री होते. पाच गुलाबांचा राउंड बुके १५० रुपयांना विकला जातो, असे फुलविक्रेते गणेश आहेर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)