पाच बिबट्यांनी मांडला रस्त्यावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST2021-06-18T04:08:22+5:302021-06-18T04:08:22+5:30
मंचर: कळंब- लौकी रस्त्यावर तब्बल पाच बिबट्यांनी ठिय्या मांडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. येथे पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली ...

पाच बिबट्यांनी मांडला रस्त्यावर ठिय्या
मंचर: कळंब- लौकी रस्त्यावर तब्बल पाच बिबट्यांनी ठिय्या मांडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. येथे पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंबेगाव तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्यांचा वावर वाढला आहे. अनेक ठिकाणी वारंवार जनावरांवर हल्ले होत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. कळंब-लौकी रस्त्यावर पंधरा मिनिटे पाच बिबट्यांनी ठिय्या मांडून रस्ता अडवून धरला होता. या घटनेमुळे कळंब-लौकी परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दोन वर्षांपूर्वी बिबट्यांनी या परिसरात बळीराजाची जनावरे मोठ्या प्रमाणावर हल्ला करून नष्ट केली होती. नागरिकांच्या मनातून भीती अजून जात नसताना या दोन वर्षांत अनेकवेळा बिबट्याने अनेक ठिकाणी दर्शन दिले आहे व जनावरांवर हल्ले केले होते. लौकी परिसरातील रानुबाई मंदिर ते कळंब-लौकी रस्त्यावरील अनेक परिसरामध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांना अंधार पडल्यानंतर घराच्या बाहेर पडणे धोक्याचे होऊ लागले आहे. या परिसरातून आत्तापर्यंत 40 हून अधिक प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले आहे.
बुधवारी रात्री कळंब येथून सौरभ थोरात व ज्ञानेश्वर थोरात लौकी येथे येत असताना थोरातवस्ती नजीक रस्त्यावर काहीतरी बसले असल्याचे त्यांना जाणवले. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याकारणाने त्यांनी भीत भीत थोड्या अंतरावर गाडी थांबून व्यवस्थित पाहिले असता त्यांना पाच बिबटे दिसले. आपल्या चारचाकी वाहनाचा हॉर्न वाजवल्यावर बिबटे पळून गेले.