दुसऱ्या बाजीरावांच्या काळात पुण्यात सर्वप्रथम झाले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:09 IST2021-01-14T04:09:44+5:302021-01-14T04:09:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दुसरे बाजीराव पेशव्यांच्या काळात देवी रोगामुळे खूप लोक मृत्युमुखी पडत असत. त्या काळात डॉक्टर ...

दुसऱ्या बाजीरावांच्या काळात पुण्यात सर्वप्रथम झाले लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दुसरे बाजीराव पेशव्यांच्या काळात देवी रोगामुळे खूप लोक मृत्युमुखी पडत असत. त्या काळात डॉक्टर कोटस यांच्याकरवी दुसऱ्या बाजीरावांची पत्नी वाराणसीबाई हिला लस दिली होती. सप्टेंबर १८०६ मध्ये पुण्यामध्ये सर्वप्रथम लसीकरण यशस्वीरीत्या पार पडले होते. सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्हिशिल्ड’ लसींचे वितरण सुरू असताना पुण्यातील पहिल्या लसीकरणाचे महत्वही अधोरेखित होते.
इतिहास संशोधक मंदार लवाटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की रघुनाथपंत, जनार्दनपंत, सदाशिवभाऊ, नारायणराव यांनाही देवी झाल्या होत्या. युरोपमधून लस आणून मुंबईत देण्याचा प्रयत्न झाला होता.
युरोपमधून काचेमध्ये दोरे बुडवून लस आणली. येथील काही मुलांना ती लस दिली. मात्र, देवी फुगल्या नाहीत म्हणजेच लस यशस्वी ठरली नाही. कोलकात्याहून आणण्याचाही प्रयत्न अयशस्वी ठरला. शेवटी मुंबईत स्थानिक पातळीवर लस तयार करण्याचे काम सुरू झाले.
रोमला लस आल्याचे मुंबईचा गव्हर्नर डंकन याला समजले. त्याने रोमवरून बगदाद आणि तेथून मुंबईत लस आणली. तो दिवस होता १४ जून १८०२. पाच मुलांना ती लस टोचली. मुंबईला तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ऑक्टोबर १८०२ मध्ये पुण्यास पाठवली. पुण्यात लस टोचल्यावर ती यशस्वी होईना; कारण, ती कशी सांभाळावी ते जाणणारा इंग्रज डॉक्टर आपल्याकडे नव्हता. दोन-तीन वर्षे प्रयत्न केल्यावर पूना रेसिडन्सीतील सर्जन कोटस यांना यश मिळाले. सप्टेंबर १८०६ मध्ये पहिला प्रयत्न यशस्वी झाला. तेव्हापासून संगमावर (आताचा जिल्हा न्यायाधीश बंगला) येथे लस टोचण्यास सुरुवात झाली.
‘कर्नल क्लोज याच्या सांगण्यावरुन डॉ. कोटस यांच्याकरवी मुलांना देवीची लस दंडावर देण्यास सुरुवात झाली. याबाबतचे वृत्त बाजीरावाला समजले. बाजीराव आणि कर्नल क्लोज यांचे चांगले संबंध होते. २२ डिसेंबर १८०६ रोजी बाजीरावाची पत्नी वाराणसीबाई हिला लस टोचली. वाराणसीबाईचे वय सहा-सात वर्षे होते. त्यावेळी देवी उत्तम फुगल्या म्हणजेच लसीचा उपयोग झाला. त्यावेळी बाजीरावाने कोटसला २००० रुपये दिले, याचा उल्लेखही लेखी स्वरुपात आढळतो. त्यानंतर पुण्यात सगळयांनी देवी काढून घ्यायला सुरुवात केली’, असेही लवाटे यांनी सांगितले.
---
दुसऱ्या बाजीरावांचे कौतुकास्पद पाऊल
बाजीरावांनी कंपनी सरकारला सांगितले की, कोटस यांना कायमची या कामासाठी नेमणूक करण्यास सांगितले. त्यासाठी लसीकरणासाठी वेताळ पेठेतला (आताची गुरुवार पेठ) एक बंगला दिला. त्या काळात स्त्रिया घराबाहेर पडत नसत, एका कोशात असत. रुढी-परंपरांचा मोठा पगडा असलेल्या काळात बाजीरावाने आपल्या पत्नीला इंग्रज माणसाकडून लस टोचून घेतली, ही गोष्ट कौतुकास्पद आहे.
- मंदार लवाटे, इतिहास संशोधक