‘सिरम’ला केंद्राकडून एक कोटी दहा लाख लशींची पहिली ऑर्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:30+5:302021-01-13T04:27:30+5:30
पुणे : सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाला केंद्र सरकारने कोविशिल्ड लशीच्या एक कोटी दहा लाख डोसांची पहिली ऑर्डर दिली आहे. ...

‘सिरम’ला केंद्राकडून एक कोटी दहा लाख लशींची पहिली ऑर्डर
पुणे : सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाला केंद्र सरकारने कोविशिल्ड लशीच्या एक कोटी दहा लाख डोसांची पहिली ऑर्डर दिली आहे. सरकारला ही लस केवळ २०० रुपयांमध्ये मिळणार आहे. ‘सिरम’कडून लवकरच या लसीचा पुरवठा सुरू केला जाणार असून कुल-एक्स कोल्ड चेन लिमिटेड ही कंपनी देशभरात लसींची वाहतुक करणार असल्याचे समजते.
कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापराला मागील आठवड्यातच मान्यता मिळाली आहे. मात्र, कोव्हॅक्सिन लस सध्या उपलब्ध होऊ शकणार नाही. सिरमकडून कोविशिल्डचे सुमारे ५ कोटीहून अधिक डोसची उत्पादन घेण्यात आले आहे. त्यामुळे आता केवळ केंद्र सरकारच्या ऑर्डरची प्रतिक्षा असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी मागील आठवड्यातच स्पष्ट केले होते.
केंद्र सरकारकडून संस्थेला पहिली ऑर्डर मिळाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच या लसची किंमतही २०० रुपये निश्चित करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आता ‘सिरम’कडून लसींचा पुरवठा एक-दोन दिवसांतच सुरू होण्याची शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्युटकडून पुण्यातील प्रकल्पामध्येच लसीचे उत्पादन केले आहे. त्यामुळे पुण्यातून विमानाद्वारे देशभरातील विविध शहरांमध्ये लस पोहचविली जाईल. तसेच कुल-एक्स कोल्ड चेन या कंपनीकडून लसीची शहरांतर्गत वाहतुक केली जाणार असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.
चौकट
पहिल्या टप्प्य्यात देशातील खासगी व शासकीय रुग्णालयांतील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांपुढील नागरीक व ५० वर्षांखालील अन्य आजार असलेल्या नागरिकांना लस देण्याचे नियोजन आहे. पुढील सहा ते आठ महिन्यांत देशातील ३० कोटी जनतेला ही लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात कोविशिल्ड लसीला प्राधान्य मिळणार आहे.