प्रथम परदेशात जाताना आमचीही उडाली होती धांदल; ‘शोध मराठी मनाचा’मध्ये उमटला सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 14:52 IST2018-01-02T14:47:45+5:302018-01-02T14:52:13+5:30
भारतभूमी आणि भारतातील लोकांवर आमचे प्रेम आहेच, पण एकूणच प्रगतीचा विचार करता भारतीय व्यवस्थेतील बाबुगिरीवर योग्य ते चाप बसविण्याची गरज उपस्थित मान्यवरांनी एकमताने व्यक्त केली.

प्रथम परदेशात जाताना आमचीही उडाली होती धांदल; ‘शोध मराठी मनाचा’मध्ये उमटला सूर
पुणे : आम्हा प्रत्येकाची सुरुवात ही शून्यातूनच झाली असून, पहिल्यांदा परदेशात जाताना आमचीदेखील धांदल उडाली होती, त्यामुळे कोणताही न्यूनगंड न बाळगता आपले ध्येय निश्चित करून युवकांनी वाटचाल केली पाहिजे. भारतभूमी आणि भारतातील लोकांवर आमचे प्रेम आहेच, पण एकूणच प्रगतीचा विचार करता भारतीय व्यवस्थेतील बाबुगिरीवर योग्य ते चाप बसविण्याची गरजही उपस्थित मान्यवरांनी एकमताने व्यक्त केली.
निमित्त होते, जागतिक मराठी अकादमीतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आयोेजित 'शोध मराठी मनाचा' या १५व्या जागतिक संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील परिसंवादाचे. समद्रापलिकडे (भाग १) या परिसंवादात किशोर गोरे (अमेरिका) संगीता तोडमल (अमेरिका), अविनाश पाध्ये (अमेरिका), रवींद्र काळे (दुबई), नॅप अल्मेडा (आॅस्ट्रोलिया), शीला परेरा (आस्ट्रेलिया), गजानन सबनीस (अमेरिका), सुनिल देशमुख (फ्लोरिडा) आणि सुरेश तलाठी यांनी भाग घेऊन आपले अनुभव कथन केले. केतन गाडगीळ आणि स्नेहल दामले यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
कोणाचे परदेशात जाऊन स्थायिक होणे खूप नियोजनपूर्वक, तर कोणाचे परदेशात जाणे अगदी अपघातानेच, परदेशात सुरुवातीच्या काळात कोणाला अतिशय सुखद अनुभवांची शिदोरी, तर कोणापुढे संघर्षाचे डोंगर उभे ठाकलेले आहेत. पण या सगळ्यांतून परदेशात स्थायिक होऊ पाहणाऱ्या मराठी बांधवांना त्या त्या देशातल्या मराठी मंडळांनी केलेली मदत निश्चितच मोलाची आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून परदेशात स्थायिक झालेल्यांचे मराठी बांधवांचे विविधांगी अनुभव उपस्थित सर्वांनाच समृद्ध करून गेले.
परदेशात स्थायिक होऊन आपला उद्योग किंवा व्यवसाय उभा करायचा, तर प्रयत्नांच्या पराकाष्ठेला पर्याय नाही, असे सांगून या मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अनेक देशांमध्ये एकच धर्म किंवा एकाच विचारधारेच्या लोकांची संख्या खूप जास्त आढळून येते. भारतात मात्र याबाबतीत असलेली विविधता लक्षात घेऊन सर्वंकष प्रगतीसाठी सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत, असा सूर या परिसंवादात निघाला.