तांत्रिक बिघाडामुळे रामटेकडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:59+5:302021-02-05T05:17:59+5:30
पुणे : रामटेकडी येथील महापालिकेच्या आदर्श कचरा प्रकल्पामधील आगीची घटना तांत्रिक बिघाडामुळे लागल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. परंतु, ...

तांत्रिक बिघाडामुळे रामटेकडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात आग
पुणे : रामटेकडी येथील महापालिकेच्या आदर्श कचरा प्रकल्पामधील आगीची घटना तांत्रिक बिघाडामुळे लागल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. परंतु, या घटनेसंदर्भात पोलीसही तपास करत आहे. परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा व स्थानिक नागरिकांकडे चौकशी करत आहेत. या प्रकल्पामधील दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, महिन्याभरात पुन्हा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी दिली.
रामटेकडी येथील आदर्श प्रकल्पामध्ये शनिवारी संध्याकाळी आग लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा आणि आरडीएफ जळाले तसेच यंत्रसामग्रीचेही नुकसान झाले आहे. वेळेत आग आटोक्यात आणल्याने फार मोठी दुर्घटना घडली. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, आगीच्या घटनेनंतर प्रत्यक्ष प्रकल्पाची पाहणी करून या ठिकाणी काम करणारे कर्मचारी व लगतच असलेल्या दुकानदारांकडे चौकशी केली. या चौकशी व पाहणीवरून प्रथमदर्शनी आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे. तसा अहवाल आयुक्तांकडे दिला आहे. पोलीसही या दुर्घटनेची चौकशी करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून, नागरिकांकडेही सखोल चौकशी केली जात आहे.
दरम्यान, आंबेगाव येथील कचरा प्रकल्पाला आग लावण्याची घटना घडल्यानंतर तीन महिन्यांतच रामटेकडी येथील प्रकल्पामध्ये आगीची घटना घडली आहे. विशेष असे की हे दोन्ही प्रकल्प एकाच ठेकेदाराचे आहेत. हे दोन्ही प्रकल्प तूर्तास बंद असल्याने शहरात गोळा होणाऱ्या अतिरिक्त १५० टन कचऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.