अग्निशामक कर्मचारी सुरक्षित, सीमाभिंतीसह अद्ययावत कक्ष होणार उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 23:54 IST2018-11-16T23:54:03+5:302018-11-16T23:54:30+5:30
तळवडेतील केंद्र : सीमाभिंतीसह अद्ययावत कक्ष होणार उपलब्ध

अग्निशामक कर्मचारी सुरक्षित, सीमाभिंतीसह अद्ययावत कक्ष होणार उपलब्ध
तळवडे : येथील सॉफ्टवेअर पार्क चौकात जकात नाक्याच्या शेडमध्ये दोन वर्षांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात अग्निशामक केंद्राची उभारणी करण्यात आली होती. पुरेशा सुविधा नसल्यामुळे अग्निशामक केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले होते. या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार येथे सीमाभिंत उभारण्यात येत असून, कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत कक्ष उभारण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटणार आहे.
तळवडे येथील अग्निशामक केंद्राला सीमाभिंत, कार्यालय, कर्मचारी खोली उभारणीचे काम सुरू करण्यात आले. नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, अग्निशामक विभागाचे उप अधिकारी ज्ञानेश्वर भालेकर, रवींद्र सोनवणे या वेळी उपस्थित होते. अग्निशामक केंद्रालगत वनीकरण आहे. केंद्राला सीमाभिंत नसल्याने सरपटणारे प्राणी, भटकी कुत्री तसेच इतर प्राण्यांचा उपद्रव होत होता. लवकरच या समस्या सुटणार आहेत.
तळवडे येथे मोठ्या प्रमाणात लघुउद्योगांचे जाळे उभारले जात आहे. नागरीकरण वाढत आहे. या परिसरात सॉफ्टवेअर चौकात तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या अग्निशामक केंद्रामुळे वेळोवेळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु रात्री-अपरात्री या ठिकाणी सरपटणारे प्राणी येत असल्याने कर्मचाºयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु यावर तोडगा काढून महापालिकेच्या वतीने कायमस्वरूपी अग्निशामक केंद्राची उभारणी करण्याच्या कामाला सुरूवात केली आहे.त्यामुळे कर्मचाºयांच्या समस्या सुटणार आहेत.
- प्रवीण भालेकर, नगरसेवक
दोन वर्षांपूर्वी तळवडे येथे अग्निशामक केंद्राची महापालिकेतर्फे उभारणी करण्यात आली. आपत्तीच्या वेळी या केंद्राच्या माध्यमातून मोलाची मदत झाली आहे. या केंद्राच्या सीमाभिंत उभारणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. इतर पायाभूत सुविधाही महापालिकेतर्फे पुरविल्या जाणार आहेत.
- पंकज भालेकर, नगरसेवक