जवानांच्या सुरक्षेची ‘अग्नि’परीक्षा
By Admin | Updated: July 19, 2014 03:23 IST2014-07-19T03:23:35+5:302014-07-19T03:23:35+5:30
आग लागल्याचा कॉल नियंत्रण कक्षामध्ये येऊन धडकताच वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करीत घटनास्थळी पोहोचून आगीमध्ये अडकलेल्या नागरिकांचा जीव वाचवावा लागतो

जवानांच्या सुरक्षेची ‘अग्नि’परीक्षा
दीपक जाधव, पुणे
आग लागल्याचा कॉल नियंत्रण कक्षामध्ये येऊन धडकताच वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करीत घटनास्थळी पोहोचून आगीमध्ये अडकलेल्या नागरिकांचा जीव वाचवावा लागतो. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांच्या सुरक्षिततेकडे मात्र प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. निकृष्ट गणवेश, अपुरी हेल्मेट या साधनसामग्रीसह त्यांना झुंजावे लागत आहे.
मुंबईतील लोटस इमारतीला लागलेल्या आगीत अग्निशामक दलाचा एक जवान शहीद झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. २२ मजली इमातरतीला लागलेली आग विझविताना धुरामध्ये श्वास कोंडला गेल्याने अग्निशामक दलाच्या जवानाला जीव गमवावा लागला. पुण्यामध्येही आगीची मोठी दुर्घटना घडल्यास पुरेशा साधनसामग्रीअभावी अग्निशामक दलाला
कठोर परीक्षा द्यावी लागेल, अशी परिस्थिती आहे. शहर अग्निशामक दलामध्ये २० अधिकारी व ४०० जवान कार्यरत आहेत. त्यांना अडीच वर्षांपासून गणवेश दिला नव्हता. त्यानंतर देण्यात आलेला गणवेश अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. तसेच, हेल्मेटची संख्या अत्यंत अपुरी आहे. आगीचा कॉल मोठा असल्यास फायरगाडीसोबत रेस्क्यू व्हॅन पाठविली जाते. या व्हॅनमध्ये जंपिंग सेट, जनरेटर व इतर आवश्यक साधनसामग्री असते. शहर अग्निशामक दलाकडे केवळ दोनच रेस्क्यू व्हॅन आहेत, त्यांची अवस्थाही बिकट आहे. शहरातील इमारतींचे आॅडिट करून त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानांच्या सुरक्षेचे आॅडिट करण्याची गरज आहे. एखादी दुर्घटना घडून गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याची भावना दलातील जवानांनी व्यक्त केली.