पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने मी ‘गद्दार’ असल्याचा उल्लेख केला. मला पक्षाकडून नोटीस मिळणार असल्याचेही समजले. ‘गद्दार’ या शब्दाचा अर्थ आता इतिहासाचा आणि शब्दकोशाचा अभ्यास करून शोधून काढावा लागेल, असे मत आमदार अनिल भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.‘सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेसला मी ‘बरा’ वाटलो. यापुढेही पक्षाने नीट वागणूक दिली, तर यशस्वी कामकाज करेन. पण, मला दूर ठेवायचा निर्णय घेतल्यास विचार करावा लागेल. सध्याच्या निवडणुकीत पक्षाचे काय नुकसान झाले आहे, याचे चिंतन करणे गरजेचे आहे’, असे सूतोवाच त्यांनी केले.स्त्रियांना राजकारणात ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. माझी पत्नी रेश्मा भोसले यांच्या रूपाने स्त्रीशक्तीचा विजय झाला आहे. रेश्मा भोसले यांनी निवडणुकीला उभे राहण्यास माझा शेवटपर्यंत विरोध होता. मात्र, कार्यकर्त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येण्यास तिला आग्रह केला. या विजयाचे श्रेय सर्वस्वी तिचे आहे. तिच्या कामावर विश्वास ठेवून नागरिकांनी कौल दिला. ’रेश्मा भोसले यांनी विजय मिळाल्यानंतर महापौरपदासाठी दावा केला आहे. याबाबत भोसले म्हणाले, ‘महापौरपदाच्या दाव्याबाबत गडबड करणे चुकीचे आहे. महापौर कोण होणार, याचा निर्णय त्यांचे पक्षश्रेष्ठीच घेतील. रेश्मा भोसले यांनी महापौर व्हावे की नाही, हे मी कोण ठरवणार?’ (प्रतिनिधी)
गद्दार शब्दाचा अर्थ शोधून काढेन
By admin | Updated: February 24, 2017 03:08 IST