अखेर नवव्या दिवशी पाचंगेंचे उपोषण मागे
By Admin | Updated: May 11, 2017 04:11 IST2017-05-11T04:11:32+5:302017-05-11T04:11:32+5:30
शेतकरीबांधवांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ११ कलमी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी

अखेर नवव्या दिवशी पाचंगेंचे उपोषण मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : शेतकरीबांधवांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ११ कलमी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांचे आमरण उपोषण सुरू होते. तब्बल आठ दिवस उलटूनही शासनदरबारी मागण्या मान्य करण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली केल्या जात नव्हत्या. त्यामुळे पाचंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या आंदोलकांमधून चिडीची भावना व्यक्त होत होती.
अखेर उपोषणाच्या नवव्या दिवशी मंगळवारी (दि. ९) रात्री उशिरा आमदार सुरेश गोरे यांनी आंदोलनस्थळी पाचंगे यांची भेट घेतली. शेतकरीहिताच्या असलेल्या प्रमुख ११ कलमी मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी आपली विशेष तातडीची बैठक आयोजिली जाईल, अशा आशयाचे लेखी पत्र पाचंगे यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर पाचंगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख राम गावडे, विजय शिंदे, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर, मधुकर शिंगाडे, दीपाली शेळके, बाळासाहेब शेळके, शिवाजी मांढरे, उमेश मोरे, सुहास मलगुंडे, नामदेव गोडसे, भूदेव शिंदे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. विजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दीपाली शेळके यांनी आभार मानले.