...अखेर बावडा ग्रामीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST2021-04-25T04:09:08+5:302021-04-25T04:09:08+5:30

‘लोकमत वृत्ताची दखल’ बावडा : राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून येथे उभारलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन ...

... finally Bavda Grameen | ...अखेर बावडा ग्रामीण

...अखेर बावडा ग्रामीण

‘लोकमत वृत्ताची दखल’

बावडा : राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून येथे उभारलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज (दि. २३) करण्यात आले. या वेळी कोरोना पार्श्वभूमीवर कोविडच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करून या रुग्णालयासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री असताना सुमारे सतरा कोटींचा निधी या इमारतीसाठी उपलब्ध करून दिला होता. सुसज्ज अशीही इमारत बांधून मागील अनेक वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. सध्या बावडा व परिसरात कोरोनाने उग्ररूप धारण केल्याने सदरची इमारत चालू करून याठिकाणी कोविड सेंटर उभारावे, अशा आशयाचे छायाचित्रासह वृत्त गुरुवारी (दि. २२) ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केल्यानंतर शासकीय पातळीवर हालचाली वाढल्या. शुक्रवारी (दि. २३) सकाळीच या ठिकाणी अंकिता पाटील यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तर या वृत्ताचे दखल घेत तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांनी काल तालुक्यात झालेल्या विविध कार्यक्रमात बावडा येथे लवकरच शंभर बेडचे कोविड सेंटर चालू करणार असल्याचे जाहीर केले होते.

अंकिता पाटील म्हणाल्या की, बावडा व परिसरातील गरजू लोकांना मोफत व चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळावी या दृष्टिकोनातून २०१२ साली बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयमध्ये केले व जागतिक बँकेकडून रुग्णालय इमारतीसाठी विशेष निधी मंजूर करून हे भव्य ग्रामीण रुग्णालय उभारले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून १७ कोटी रुपये रुग्णालयासाठीचा निधी तसेच मी बजाज ग्रुप यांच्या सीएसआर फंडामधून १० लाख रुपये किमतीचे या रुग्णालासाठी लागणारे विविध साहित्य उपलब्ध करून दिल्या आहेत. या रुग्णालयामध्ये ५० बेडच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच रुग्ण, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या वेळी इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे, उपसभापती संजय देहाडे, बावडा ग्रामपंचायतीचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच नीलेश घोगरे, सदस्य अमोल घोगरे, ग्रामसेविका अंबिका पावसे तसेच बावडा आरोग्य केंद्राचे डॉ. विनोद घोगरे आदी उपस्थित होते.

बावडा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अनेक वर्ष रखडलेल्या इमारतीचे उद्घाटन आज अंकिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

२४०४२०२१-बारामती-०२

————————————————

Web Title: ... finally Bavda Grameen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.