...अखेर बारामतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:24+5:302021-05-05T04:16:24+5:30
बारामती : दुकाने बंद ठेवू देखील कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने प्रशासनाने अखेर मंगळवारी (दि. ४) रात्री ...

...अखेर बारामतीत
बारामती : दुकाने बंद ठेवू देखील कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने प्रशासनाने अखेर मंगळवारी (दि. ४) रात्री १२ वाजल्यापासून सात दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केवळ औषधे आणि दूधविक्री दुकाने सुरु राहणार आहेत.त्यात दूधविक्री केवळ सकाळी ७ ते ९ या वेळेत दोन तास सुरु राहणार आहे.
सोमवारी (दि. ३) उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत निर्णय घेण्यात आला. या वेळी व्यापारी महासंघासह उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बारामतीत लॉकडाऊन सुरु असला तरी तो कडक स्वरूपाचा नाही, अनेक ठिकाणी या काळातही गर्दी दिसते. अशी चर्चा झाल्यानंतर साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनचा मार्ग वापरण्याच्या दृष्टीने अजित पवार यांच्या बैठकीत रविवारी (दि. २) चर्चा झाली होती. या वेळी पवार यांनी कडक लॉकडाऊनबाबत प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत कडक लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला. दरम्यान, एमआयडीसीतील बडे उद्योग, कंपन्या सुरुच राहणार आहे. किरकोळ व्यवसाय मात्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे समजते. यामध्ये खाजगी कोचिंग क्लासेस, आठवडी बाजार, धार्मिक, राजकीय, मंगल कार्यालय, लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम, किराणा दुकाने, भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत.
सात दिवसांत रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास आणखी सात दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले आहेत.
-----------------
हॉटस्पॉट परिसर व्यवहार बंदच राहणार
शहरातील हॉटस्पॉट प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असून, पुढील आदेश येईपर्यंत या परिसरातील सर्व व्यवहार, दुकाने बंद राहणार असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.
----------------