खोर : दौंड तालुक्यामधील दुष्काळी पट्टा म्हणून खोर भागाची ओळख आहे. मात्र, हाच परिसर आता अंजिराचे लाखो रुपयांचे उत्पादन घेण्यात अग्रेसर बनला आहे. ऐके काळी या भागामधील ‘खोरचे वांगे’ पुण्याच्या बाजारपेठेत अग्रगण्य होते. या वांग्याची जागा आता अंजिराने घेतली असून, या भागामधील अंजीर आता पुणे, औरंगाबाद, नांदेड, मालेगाव, परभणी, अहमदनगर या बाजारपेठेमध्ये नावारूपाला आले आहे.खोरच्या परिसरामधील डोंगराळ भागात डोंबेवाडी वसलेले आहे. हा भाग मात्र डोंगराळ, परंतु शेजारीच असलेल्या डोंबेवाडी पाझर तलावाच्या पाण्यामुळे नेहमीच हिरवागार असतो. या भागात सध्याच्या काळात ३५ हेक्टर अंजिराचे क्षेत्र असून, साधारणत: १३ हजारांहून जास्त प्रमाणात अंजिराची झाडे आहेत. अनेक वर्षांपासून पुण्याच्या बाजारपेठेमध्ये या अंजिराला ८० रुपये प्रतिकिलोप्रमाणे बाजारभाव मिळतो. मात्र, अंजीरतोडणी, वाहतूकखर्च, अंजिराची योग्य निवड यांमुळे या भागातील शेतकरीवर्गाला परवडणारे नसल्याने आता एक वर्षापासून औरंगाबाद, नांदेड, मालेगाव, परभणी, अहमदनगर या ठिकाणचे व्यापारी स्वत: खोर परिसरात येऊन अंजिराचे लिलाव करीत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा, निवडीचा खर्च वाचला जात आहे.याबाबत माहिती देताना शेतकरी बाळासाहेब नारायण डोंबे म्हणाले, की अंजिराच्या बागांना अगदी रोपे लावल्यापासून फळ बार धरण्यापर्यंत एका हेक्टरला १ लाख रुपये इतका खर्च येतो. यामध्ये कृषी विभागाच्या नियामानुसार ६ बाय ६ मीटर इतके दोन रोपांमध्ये अंतर ठेवून लागवड केल्यानंतर वाफे तयार करणे, झाडे योग्य मापात आल्यानंतर पानांची छाटणी करणे, रासायनिक खतांचा तसेच रोगप्रतिकारक कीटकनाशकांच्या खर्च व मजुरीसह एका हेक्टरला १ लाख रुपये इतका खर्च येतो. मात्र, अंजिराची उलाढाल ही विक्रमी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे डोंबे यांनी सांगितले. फळधारणा केल्यानंतर जास्तीत जास्त ४ महिने बार चालतो. यामध्ये प्रतिकिलो ६० रुपये बाजारभाव मिळाला, तरीसुद्धा प्रतिहेक्टर २५ लाखांपर्यंत उत्पादन अंजिराच्या माध्यमातून मिळते. मात्र, पुरंदर जलसिंचन योजना व जनाई-शिरसाई योजना कार्यान्वित झाली, तर या भागाचा मोठा पाणीप्रश्न मार्गी लागणार असल्याचे शेतकरीवर्गामधून बोलले जात आहे.खोर परिसरामधील मोहन डोंबे, रंगनाथ डोंबे, प्रकाश डोंबे, गणेश डोंबे, नाना डोंबे, संभाजी डोंबे, युवराज डोंबे, संतोष डोंबे, राघू डोंबे या शेतकऱ्यांनी अंजिराची विक्रमी लागवड केली आहे.ा अंजिराचे ५ लाखांचे उत्पादन
वीस गुंठ्यात अंजिराचे ५ लाखांचे उत्पादन
By admin | Updated: December 27, 2014 22:58 IST