कॅन्सरशी लढताना...
By Admin | Updated: February 2, 2015 23:26 IST2015-02-02T23:26:06+5:302015-02-02T23:26:06+5:30
महागडी औषधेच जास्त गुणकारी, असा एक समज आपल्या मनात असतो. कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा होण्यासाठी आर्थिक तडजोडी करून औषधोपचार केले जातात.

कॅन्सरशी लढताना...
महागडी औषधेच जास्त गुणकारी, असा एक समज आपल्या मनात असतो. कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा होण्यासाठी आर्थिक तडजोडी करून औषधोपचार केले जातात. परंतु, यासाठीही जेनेरिक औषधांचाही पर्याय आहे.
णे एकेकाळी कॅन्सर म्हटला, की लोकांच्या उरात धडकी भरत असे. कारण त्यावर उपचारच उपलब्ध नव्हते. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्राने हे आव्हान स्वीकारले. एकेकाळी रुग्णांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या कर्करोगावर अमाप संशोधन झाले. कर्करोगाची कारणे, निदान व उपचार यात अभूतपूर्व प्रगती झाली. याचा अर्थ असा नव्हे, की मानवाने त्यावर विजय मिळवला. आजही ही प्रगती अपूर्ण आहे. तथापि, अनेक प्रकारच्या कर्करोगांचे अचूक निदान व त्यातील बऱ्याचशा प्रकारांवर विविध उपचार उपलब्ध झाले आहेत. त्यातील काही रुग्णांचे आयुष्य व त्याचा दर्जा वाढवणारे तर काही मृत्यूपर्यंतचे जीवन सुखद वा सुसह्य करणारे आहेत.
कर्क रुग्णाच्या उपचारासाठी वैद्यकांचे सांघिक प्रयत्न महत्त्वाचे असतात. कारण कॅन्सरचे कितीतरी प्रकार आहेत. विविध चाचण्याव्दारे कॅन्सरच आहे ना? असल्यास कुठल्या प्रकारचा व तो किती गंभीर स्वरूपाचा (स्टेज) आहे, याचे निदान करता येते व उपचाराची रूपरेषा ठरते.
कॅन्सरवर तीन प्रकारच्या प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध आहेत. पैकी एक म्हणजे शस्त्रक्रिया. कर्कग्रस्त अवयव जीवनावश्यक नसेल तर तो काढून टाकला की रुग्ण रोगमुक्त होऊ शकतो. दुसरा उपाय म्हणजे कर्करोधी औषधे. वेगवेगळ्या प्रकारच्या कर्कासाठी वेगवेगळी औषधे वापरली जातात. बहुतेक कर्कांना निष्प्रभ करण्यासाठी एकाहून अधिक औषधे द्यावी लागतात. तिसरी उपचारपद्धती म्हणजे किरणोपचार (रेडिएशन) थेरपी यातही वेगवेगळे प्रकार असून हे उपचारही फेरीपद्धतीने घ्यावे लागतात. आणखी गुंतागुंतीची बाब म्हणजे कॅन्सरनुसार या तिन्ही उपचारपद्धतींचा रास्त सयुक्तिक वापर करावा लागतो. म्हणजे काही कॅन्सर यापैकी केवळ एकाच पद्धतीने बरे होतील, काहींना दोन पद्धती वापराव्या लागतील तर काहींसाठी रुग्णाला तिन्ही उपचार घेणे अनिवार्य होय. या उपचारपद्धतींचा क्रमही कर्कानुसार बदलतो. म्हणजे एखाद्या कॅन्सरसाठी आधी औषधे, मग शस्त्रक्रिया व नंतर किरणोपचार तर दुसऱ्या कर्कासाठी वेगळा क्रम अधिक उपयुक्त ठरतो. म्हणून कॅन्सरसाठी उपचार घेताना या सर्व प्रकारच्या तज्ज्ञांची एकत्रित चर्चा होऊन सर्वाधिक रास्त उपचार करणे फार महत्त्वाचे असते.
पूर्वी कॅन्सर म्हणजे साक्षात मृत्यूच असे साधारण समीकरण होते. आता ही परिस्थिती बरीच सुधारली आहे. अनेक प्रकारच्या कर्काविरुद्ध आपण लढू शकतो आणि काहींविरुद्ध तर जिंकूही शकतो! काहींशी समेट करावा लागतो. थोड्याच कॅन्सरना वा गंभीर कॅन्सरना आपल्याला नाइलाजाने शरण जावे लागते. थोडक्यात कॅन्सरला आता पूर्वीइतके घाबरण्याची गरज नाही. शक्य त्या कर्काला प्रतिबंध (उदा. तंबाखू / धूम्रपान वर्ज्य), शक्य तेवढ्या लवकर निदान व उपलब्ध सर्वात प्रभावी उपचारांचा अवलंब या त्रिसूत्रीवर आपले कर्कविरोधी युद्ध चालू आहे.
अनेक कॅन्सरचे निदान व त्यावरील उपचार ही बरीच खर्चिक बाब आहे. बऱ्याचदा हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. त्याला मुख्य खर्च औषधांचा असतो. नवनवी कर्करोधी औषधे प्रचंड महाग असतात. यावर मुख्य उपाय म्हणजे मूळ (जेनेरिक) नावाची औषधे वापरणे. अशी औषधे व्यापारी (ब्रँड) नावाने उपलब्ध औषधांपेक्षा खूपच स्वस्त असतात आणि ती तितकीच गुणकारी असल्याची खात्री करून घेतलेली असते. तेव्हा रुग्णांनी संकोच न बाळगता कॅन्सरतज्ज्ञांशी आपल्या आर्थिक अडचणीबद्दल बोलावे व त्यांना किमान किमतीचे पण तितकेच प्रभावी औषध देण्याबद्दल सांगावे.
सध्या भारतात अनेक कर्करोधी औषधे उपलब्ध आहेत. अगदी नव्या औषधांची जेनेरिक उपलब्धता नसते. मात्र, विविध रुग्णालयात त्यावरील चिकित्सा चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) सुरू असतात. त्या चाचण्यांची साद्यंत माहिती घेऊन रुग्ण त्यात सहभागी होऊ शकतात.
लेखक बी. जे. मेडिकल महाविद्यालयात
औषधशास्त्रविषयाचे प्राध्यापक (एम. डी.) आहेत.
डॉ. पद्माकर पंडित