जंगलाशी लागला लळा अन् भीती निघून गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:24+5:302021-03-09T04:12:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : किर्रर्र झाडी, दुर्गम भाग, वन्य प्राण्यांचा वावर आणि वणव्यांपासून येणारी संकटे या पार्श्वभूमीवर कार्यरत ...

जंगलाशी लागला लळा अन् भीती निघून गेली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : किर्रर्र झाडी, दुर्गम भाग, वन्य प्राण्यांचा वावर आणि वणव्यांपासून येणारी संकटे या पार्श्वभूमीवर कार्यरत वन रागिणींनी थरारक अनुभवांना वाट करून दिली.
निमित्त होते ‘तेर पॉलिसी सेंटर’ आयोजित महिला दिनानिमित्त संवाद ‘वन रागिणींशी’या कार्यक्रमाचे. गोंदिया कृषी विभागाच्या सहायक संचालक प्रणाली चव्हाण, गीता बेलपत्रे (फायर फ्री फॉरेस्ट मिशन ,मेळघाट टायगर रिझर्व्ह), स्मृती उपाध्याय (फॉरेस्ट गार्ड, बांधवगड टायगर रिझर्व्ह), राणी गरुड (मेळघाट टायगर रिझर्व्ह), लक्ष्मी मेरावी (कान्हा टायगर रिझर्व्ह), प्रिया वरेकर (वाईल्ड लाईफ रिसर्चर ,कान्हा टायगर रिझर्व्ह), हिर्मेलीन बेयपी (सामाजिक कार्यकर्ता, आसाम) या महिला वन विभाग कर्मचारी तसेच संशोधक या संवाद कार्यक्रमात सहभागी झाल्या. ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम झाला. ‘तेर पॉलिसी सेंटर’चे प्रकल्प समन्वयक सचिन अनपट यांनी त्यांच्याशी संवाद साधला तर ‘सेंटर’च्या संचालक डॉ. विनीता आपटे यांनी प्रास्ताविक केले.
गोंदिया येथील प्रणाली चव्हाण म्हणाल्या, की अजूनही दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर लग्न करून देण्याचा घाट घातला जातो. वनसेवेत दाखल झाल्यावर नक्षलवादी सीमांवर देखील काम करावे लागले. “जंगलात कधीही वन्य प्राणी समोर येऊ शकतात. अशा वेळी डोळे, नाक, कान उघडे ठेवून काम करावे लागते,” असे बांधवगड अभयारण्यात कार्यरत स्मृती उपाध्याय यांनी सांगितले. प्राण्यांना वाचविणे देखील आव्हानात्मक असते. बछड्यांना प्रेमाने दूध पाजणारी, खेळणारी वाघीण पाहण्याचे भाग्यही मला मिळाले, असे त्या म्हणाले.
गीता बेलपात्रे म्हणाल्या की, मेळघाटात जलसंधारणाचे काम आम्ही करीत आहोत. वणवे लागू नये याची जागृती आम्ही करीत आहोत. कान्हा राष्ट्रीय अभयारण्यात फॉरेस्ट गार्ड म्हणून कार्यरत लक्ष्मी मेरावी म्हणाल्या, “२००५ पासून वन खात्यात काम सुरु केले. लहानपणापासून जंगलाशी जिव्हाळा असूनही वन्य प्राण्यांबद्दल सुरुवातीला भीती वाटत होती. ती हळहळू निघून गेली. रानकुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचले, हा अविस्मरणीय क्षण होता.
राणी गरुड म्हणाल्या की, गस्त घालताना सोबत हत्यारे असतात असेही नाही. रात्री अपरात्री लागणाऱ्या आगी नियंत्रित करणे हेही आव्हानात्मक असते. कान्हा अभयारण्यात कार्यरत संशोधक प्रिया वारेकर म्हणाल्या, “नेहमीप्रमाणे ११ ते ५ कामाच्या चाकोरीत मला रस नव्हता. संशोधन ही वाट आवडीची होती. साप, वाघ वाचविणे हे ध्येय ठेवून आम्ही काम करीत असतो
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र शेंडे म्हणाले, “वन खात्यात आणि संबंधित उपक्रमात कार्यरत महिलांच्या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे. महिला अधिक उत्तमपणे वन संरक्षणाचे काम करीत आहेत. आपण निसर्गापासून दूर चाललो आहोत. जंगल, हवा, शुद्ध पाणी, शुद्ध हवा या गोष्टी अनमोल आहेत. एकत्रित प्रयत्नांनी आपण निसर्गाला जपू शकतो.”