सोशल मीडियाच्या जमान्यात पुस्तकांचा लढा
By Admin | Updated: January 19, 2016 01:33 IST2016-01-19T01:33:49+5:302016-01-19T01:33:49+5:30
तरुणांवर सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढला आहे, की चिरकाल अस्तित्व टिकविण्यासाठी पुस्तकांना आज सोशल मीडियाशी लढा करावा लागत आहे. तरुणांचे लेखन तुटपुंजे

सोशल मीडियाच्या जमान्यात पुस्तकांचा लढा
सुवर्णा नवले, ज्ञानोबा तुकारामनगरी (पिंपरी)
तरुणांवर सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढला आहे, की चिरकाल अस्तित्व टिकविण्यासाठी पुस्तकांना आज सोशल मीडियाशी लढा करावा लागत आहे. तरुणांचे लेखन तुटपुंजे आणि प्रभावहीन आहे, असा सूर ‘आजची तरुणाई काय वाचते, काय लिहिते?’ या तरुणाईवर आधारित मौलिक परिसंवादात पार पडला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपमंडपात हा परिसंवाद झाला. त्यात श्रीपाद अपराजित, राजन खान, कैलास इंगळे, दीपक पवार, जुई कुलकर्णी, राजेंद्र मुंडे सहभागी झाले होते. प्रतीक पुरी यांनी सूत्रसंचालन केले.
त्यानंतर परिसंवादात कार्यक्रमाचे अध्यक्ष अपराजित म्हणाले, ‘‘साहित्य संमेलनात तरुणांची खाद्यान्नाची रांग दिसली. त्यावरून ती रांग साहित्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे, असे वाटते. नवीन पिढीत परिपक्वता आहे. मात्र, नव्या पिढीचे लेखन पुस्तकविक्रीच्या दृष्टिकोनातून होत आहे. त्यासाठी नव्या पिढीला व्यक्त होणे गरजेचे आहे.’’
राजन खान सडेतोड भाषेत तरुणाईवर बोलले. लेखक तरुण की वयस्कर, यावर त्या लेखकाचा नवोदितपणा अवलंबून नसतो. त्यामुळे लिखाण करणारा कोणीही असो, तो तरुण आणि नवोदितच असतो. आजच्या तरुणाचे लेखन भरीव नाही. सोशल मीडियावर लिखाण केले असता, कोणीही या शिंतोडे मारून जा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुस्तकांना स्वतंत्र
ओळख आहे.
तशी स्वतंत्र ओळख सोशल मीडियाच्या जमान्यात ब्लॉगलाही नाही. आजही लिखाण जाती-पातींत अडकून आहे. सध्या लिखाण आत्मकेंद्री झाले आहे. स्वत:चा प्रभाव पडेल, असा एकही लेखक समाजात नाही. सध्याच्या तरुणांच्या जाणिवा बधिर झाल्या आहेत. साहित्यात स्वत:च्या नावाची ओळख निर्माण करावी लागते. काहीही झाले तरीही वाचनसंस्कृती मरत नाही. नव्या पिढीला चांगल्या मूल्यांचे व नीतीचे स्वप्न पडण्याची गरज आहे.’’