जातीच्या तटबंदीविरुद्ध संघर्ष करा
By Admin | Updated: January 28, 2017 01:17 IST2017-01-28T01:17:33+5:302017-01-28T01:17:33+5:30
जाती-धर्माचा आधार घेऊन राबणाऱ्या कष्टकरी जनतेचे शोषण करणारी व्यवस्था आज मोठ्या प्रमाणात फोफावललेली दिसत आहे.

जातीच्या तटबंदीविरुद्ध संघर्ष करा
पुणे : जाती-धर्माचा आधार घेऊन राबणाऱ्या कष्टकरी जनतेचे शोषण करणारी व्यवस्था आज मोठ्या प्रमाणात फोफावललेली दिसत आहे. त्यामुळे या जातीधर्माच्या तटबंदी फोडण्यासााठी चित्रकार-कलाकारांसह तरुणांनी संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. महात्मा फुलेवाड्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि
जातीमुक्ती आंदोलनाच्या वतीने आयोजित समता मेळाव्यात गुरुवारी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘कोणत्याही प्रकारच्या तटबंदी या समाजाच्या विकासातल्या अडसर असतात. त्यामुळे जातीच्या नावाने माणसा-माणसांत उभ्या केलेल्या तटबंदी झुगारून देऊन मानवमुक्तीच्या माणूसपणाची लढाई अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याची जबाबदारी सगळ््यांचीच आहे. अशा प्रकारची तटबंदी तोडण्याचा विचार फुले-शाहू-आंबेडकर यांनी दिला आहे. त्या मार्गाने आपण हा संघर्ष तीव्र केला पाहिजे. कलाकारांनी चित्रकलेच्या माध्यमातून जातमुक्त समाजाकडे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून दिला आहे. आम्ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बचावासाठी तुमच्यासोबत आहोत.’’ या वेळी ज्येष्ठ चित्रकार प्रकाश जोशी, श्रीधर अंभोरे, प्रा. अंजली मायदेव, प्रा. प्रतिमा परदेशी, बाबासाहेब ललकारे आदी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने जाती तोडो... माणूस जोडो या संकल्पनेवर आयोजित चित्रप्रदर्शनातील विजेत्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. अनुजा जगताप व योगेश भुवड यांच्या चित्राला प्रथम पारितोषिक मिळाले. अमोल पवार व किसन आडे यांना द्वितीय व चैतन्य खरे व समृद्धी राजेशिर्के यांना तृतीय पारितोषिक मिळाले. शुभम करंजकर याला उत्तेजनार्थ व प्रियांका कोरडे हिचा विशेष पारितोषिकाने सन्मान करण्यात आला. चित्रप्रदर्शनात सहभागी उत्कृष्ट मुलींच्या चित्राला बालाजी वाघमारे यांच्या वतीने विशेष पारितोषिक देण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रकाश जोशी व श्रीधर अंभोरे यांनीही चित्रकलेच्या दृश्य माध्यमातील रंगरेषांचा अर्थ स्पष्ट करीत चित्राला भाषा, प्रदेशाचे बंधन नसते. त्यातील मुक्तीची आस महत्त्वाची असते, असे सांगितले. प्रा. प्रतिमा परदेशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अंजली मायदेव यांनी स्वागत केले. गौतम ललकारे यांनी आभार मानले. किसन आडे, अनिता टेकाळे, संजय धावरे यांनी विशेष
परिश्रम घेतले.