पुणे : राजकारणात करिअर घडवण्यासाठी कार्यकर्ता स्वत:ला झोकून देतो. मात्र, काही नेते कार्यकर्त्यांना मोठं होण्याची संधी देत नाहीत. याच कारणामुळे पुण्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. प्रवेशाची तारीख निश्चित झालेली नसली, तरी चर्चासत्रे आणि भेटीगाठींचे टप्पे पार पडले आहेत.
रोहन सुरवसे पाटील हे काँग्रेसचे आक्रमक युवा नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनानंतर त्यांना पोलिस कोठडीला सामोरे जावे लागले आणि ५० हजारांच्या जामिनावर मुक्तता मिळाली. त्यानंतरही त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय राहून पक्ष संघटनेसाठी काम केले. तथापि, अनेक वर्षे पक्षासाठी झटून देखील संधी मिळत नसल्याची भावना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. याशिवाय, शहरातील वरिष्ठ नेते संघटन कार्यात मदत करत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामुळे रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक पार पडल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली.