डेपोतील कचरा न उचलल्याने साथीच्या रोगाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:22+5:302021-06-09T04:13:22+5:30
पोलीस स्टेशनपासून शहरात जाणाऱ्या रस्त्यावर कचरा ओसांडून वाहू लागला आहे. या ओल्या कचऱ्यावर डुकरे आणि भटक्या कुत्र्यांनी ...

डेपोतील कचरा न उचलल्याने साथीच्या रोगाची भीती
पोलीस स्टेशनपासून शहरात जाणाऱ्या रस्त्यावर कचरा ओसांडून वाहू लागला आहे. या ओल्या कचऱ्यावर डुकरे आणि भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. तर सुका कचरा साठवण्याच्या जागेत ओला कचरा टाकण्याची नामुष्की नगरपरिषदेवर आली आहे. तर, या कचऱ्यातील पावसाचे पाणी मैदानातून थेट पोलीस स्टेशनच्या आवारात दुर्गंधीयुक्त काळे पाणी येत आहे. शहरातील कचरा एवढ्या मोठ्या प्रमाणात साचला आहे की, आता कचरा टाकण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. त्यातच पाऊस पडल्याने हा कचरा भिजला असून कुजला आहे. त्यातून परिसरात दुर्गंधी पसरली असून साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
वेळोवेळी नगरपरिषदेला याबाबत तक्रारी आणि निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ‘आम्ही राजगुरुनगरकर’ या संघटनेच्या वतीने नगरपरिषद प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस स्टेशन या कार्यालयांना निवेदन देऊन त्वरित कचरा हटवण्याची मागणी करण्यात आली. सदरचा कचरा दहा जूनपर्यंत उचलला न गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, निवेदन स्वीकारताना मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी पुढील पाच दिवसांत हा कचरा हटवला जाईल असे आश्वासन दिले तर प्रांताधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासक विक्रांत चव्हाण यांनी आजच यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले. या कामात पुढील चार दिवसांत प्रगती न दिसल्यास सदरचा कचरा भरून तो नगरपरिषदेच्या दारात खाली करण्याचा इशारा ‘आम्ही राजगुरुनगरकर’च्या शिष्टमंडळाने दिला.
यावेळी अमर टाटीया, राहुल पिंगळे, मिलिंद शिंदे, नितीन सैद, शंकर राक्षे, राहुल आढारी, नीतेश पवार, स्वप्निल माटे, दीपक थिगळे, नीलेश आंधळे उपस्थित होते.
नगरपरिषेदेने वाकी (ता. खेड) येथे एक एकर जागा कचरा साठविण्यासाठी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे हा सर्व साचलेला कचरा उचलून तिथे टाकण्यात येणार आहे. त्यामुळे येथील जागा मोकळी होणार आहे. त्या जागी शहरातील दररोज जमा होणारा ओला व सुका कचरा टाकून तो रोजच रोज प्रक्रियासाठी पाठविण्यात येणार आहे.
प्रकाश पाटील
मुख्याधिकारी राजगुरुनगर नगर परिषद
०७ राजगुरुनगर
कचरा डेपोत जागा नसल्यामुळे रस्त्यावर टाकलेला कचरा