नशीब बलवत्तर म्हणून ‘तो’ वाचला, मायलेकांचा आक्रोश : मुलावरच नोंदविला चोरीचा गुन्हा

By Admin | Updated: July 4, 2017 03:34 IST2017-07-04T03:34:19+5:302017-07-04T03:34:19+5:30

सहा दिवसांपासून नजरेआड असणाऱ्या लेकराला पाहताच ‘कुठं होतासं रं बाळा?’ असा टाहो फोडून आईने लेकराला कवटाळले अन् लेकराच्या

Fateful Balwantra read 'He', Mylak's Resentment: Stolen Record Report on Child | नशीब बलवत्तर म्हणून ‘तो’ वाचला, मायलेकांचा आक्रोश : मुलावरच नोंदविला चोरीचा गुन्हा

नशीब बलवत्तर म्हणून ‘तो’ वाचला, मायलेकांचा आक्रोश : मुलावरच नोंदविला चोरीचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
बावडा : सहा दिवसांपासून नजरेआड असणाऱ्या लेकराला पाहताच ‘कुठं होतासं रं बाळा?’ असा टाहो फोडून आईने लेकराला कवटाळले अन् लेकराच्या तोंडून ‘वैऱ्यांच्या हातून निसटून पळून गेलो म्हणून वाचलो गं आई,’ असे शब्द येताच उपस्थितांच्याही डोळ्यांत पाणी आले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून अल्पवयीन मुलगा गावगुंडांच्या तावडीतून वाचला, अशी भावना कुटुंबियांनी व्यक्त केली. तर चोरी करताना पकडल्याचा गुन्हा पोलिसांनी या मुलावर दाखल केल्याने त्यातील गुढ वाढले आहे.
एखाद्या चित्रपटाला शोभेल असा हा प्रसंग बावडा पोलीस दूरक्षेत्रात घडला.
बावडा येथे राहणारा १७ वर्षांचा समाधान सुरेश शिंदे याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. त्याचे आईवडील मोलमजुरी करून आपली उपजीविका करतात. २७ जूनला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास समाधान लघुशंकेसाठी घराबाहेर आला तेव्हा समाधानच्या कुटुंबीयांशी घर आणि जागेबाबत वाद असणाऱ्या शेजाऱ्याने त्याला मारहाण केली.
या मारहाणीतून कशीबशी स्वत:ची सुटका करून समाधान घरापासून पळून गेला. नेमका याच वेळी पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात मुक्कामी होता. समाधान एका दिंडीमध्ये सामील झाला. त्यांच्या समवेत जात त्याने थेट पंढरपूर गाठले. इकडे समाधान एकाएकी कोठे गायब झाला या काळजीने आईवडील व भाऊ चिंताक्रांत झालेले होते.
जागेच्या वादातून आपल्या मुलाचे शेजाऱ्यांनीच काही बरेवाईट तर केले नाही ना, अशी शंका कुटुंबियांच्या मनात आली. समाधानची आई शोभा शिंदे यांनी बावडा पोलीस ठाण्यात समाधानच्या अपहरणाची तक्रार नोंदविली, तर बावडा पोलिसांनी समाधानच्या विरोधात अपरात्री घरात घसून ५२ हजार रुपयांची चोरी केल्याचा गुन्हा नोंदवला.

चोरीचा आळ पुसा, तरच मुलाचा ताबा घेईन
पंढरपूर येथे गेल्यानंतर समाधान थेट तेथील पोलीस ठाण्यात हजर झाला. आपल्या सोबत घडलेला प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. पंढरपूर पोलिसांनी बावडा पोलिसांशी संपर्क करून त्यांच्या स्वाधीन केले.
बावडा पोलिसांनी समाधानच्या आईस बोलावून मुलगा ताब्यात घेण्याची विनंती केली. मात्र, सातत्याने अन्याय सहन करणाऱ्या मातेने, ‘माझ्या अल्पवयीन मुलावर घेतलेला चोरीचा आळ पुसून टाका नंतरच ताबा घेईन. मुलगा पांडुरंगाच्या कृपेने वाचला. पण तुम्ही पोलीस नाही, कसाब आहात. तुमच्याच वाट्याला असे दु:ख आले असते तर तुम्हाला आईचं काळीज कळालं असतं.

माझा मुलगा खरंच दोषी असेल तर त्याला शिक्षा द्या, पण खोटा गुन्हा का नोंदवता’ समाधानच्या आईने केलेल्या या शाब्दिक हल्ल्याने पोलीस गोंधळून गेले. मुलाला ताब्यात घेण्यास नकार दिल्याने समाधानला पुणे येथील बालसुधार गृहात पाठवले आहे. सत्य बाहेर काढण्यासाठी स्वत:हून मुलाचा ताबा नाकारणाऱ्या शोभा शिंदे यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. तसेच त्यांच्या समर्थनार्थ विविध संघटनादेखील उतरल्या आहेत.


उपोषणाचा इशारा

बावडा परिसरात खोटे गुन्हे नोंदवण्याचे प्रकार यापूर्वीदेखील घडले आहेत. मागील वर्षी रश्मिकांत तोरणे अपहरण व खून प्रकाराने तर संपूर्ण जिल्हा हादरला होता. तसेच, येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या कारभारावरदेखील प्रश्न उपस्थित झाले होते. तसाच प्रकार पुन्हा घडल्याने बावडा परिसरात चर्चेला उधाण आले आहे. कोवळ्या वयातील मुलावर असा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी.

मुलावरील खोटा गुन्हा काढून टाकून त्वरित ताबा द्यावा. यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणाचा इशारा समाधानच्या मातेने दिला आहे. दरम्यान, भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष युवराज पोळ यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेऊन, ‘याप्रकरणी प्रसंगी आंदोलन करू व तुम्हाला न्याय मिळवून देऊ’ असा धीर दिला.

Web Title: Fateful Balwantra read 'He', Mylak's Resentment: Stolen Record Report on Child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.