लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST2020-12-05T04:16:32+5:302020-12-05T04:16:32+5:30
पुणे: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी संघटनेने पणन संचालक कार्यालयासमोर ...

लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित
पुणे: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी संघटनेने पणन संचालक कार्यालयासमोर २ डिसेंबरपासून सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी सायंकाळी स्थगित केले. पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली व त्यांना लेखी पत्र दिले.
संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले, बहुसंख्य बाजार समित्यांमध्ये कडता, पोटली, पायली, अवाजवी हमाली, छुपी अडत वसूली, बोगस पावत्या, रोख पैसे दिल्यास बटावा रक्कम कापणे असे अनेक गैरप्रकार सर्रास सुरु आहेत. यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते. संघटनेने याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्याची दखलच घेण्यात येत नाही. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला. पुण्यासह नाशिक,अकोला, लातूर, हिंगोली, परभणी, नगर या ठिकाणाचे संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
स्वतंत्र भारत पक्ष, स्वर्ण भारत पार्टी व रयत क्रांती संघटना, शंभू सेनेने आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. दोन दिवस आंदोलन केल्यानंतरही पणन मंडळाकडून दखल घेण्यात येत नव्हती. आंदोलन थांबत नाही हे लक्षात आल्यानंतर सहसंचालक कोकरे यांनी शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावले असे घनवट यांनी सांगितले. कोकरे यांनी सर्व ठिकाणाच्या गैरव्यवहारांविषयी पुराव्यांसह सांगण्यात आले. त्यांनी संघटनेला लेखी आश्वासन दिले आहे. त्यानुसार महिनाभरात तक्रार असलेल्या सर्व ठिकाणची चौकशी महिनाभरात पुर्ण करणार आहेत. तसे झाले नाही तर संघटना पुन्हा आंदोलन करेल असा इशारा घनवट यांनी दिला. आंदोलनस्थळी संघटनेच्या ललीत बहाळे, सीमा नरोडे, सतीश देशमुख, लक्ष्मीकांत कौठकर, शंकर पुरकर, अनिल चव्हाण, देविप्रसाद ढोबळे, अॅड. महेश गजेंद्र गडकर, सयाजी मोरे, दिपक शिर्के, प्रशांत पांडे यांची भाषणे झाली.