बनावट नोटाप्रकरणी एकास सक्तमजुरी
By Admin | Updated: May 31, 2014 22:17 IST2014-05-31T21:42:33+5:302014-05-31T22:17:12+5:30
बनावट नोटांचा चलनात वापर केल्या प्रकरणी एकास ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली़

बनावट नोटाप्रकरणी एकास सक्तमजुरी
पुणे : बनावट नोटांचा चलनात वापर केल्या प्रकरणी एकास ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली़ मुख्य जिल्हा न्यायाधीश कालिदास वडणे यांनी हा निकाल दिला आहे़
अली बाकर शेख (वय २८, रा़ पश्चिम बंगाल) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे़ याबाबत नितीन गंगाराम चौधरी (वय २६, रा़ ताथवडे) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली होती़ ताथवडे येथील इंदिरा कॉलेजवळ चौधरी यांचे किराणा दुकान आहे़ ६ जुलै २०११ रोजी शेख याने ५०० रुपयांची नोट देऊन सिगारेटचे पाकिट विकत घेतले़ त्यावेळी चौधरी यांनी शेख याला शंभर रुपयांच्या चार नोटा परत केल्या़ त्यानंतर उर्वरित नोटा परत करीत असताना त्यांना शेख याने दिलेल्या नोटेविषयी संशय आला़ त्यांनी शेखला नोट बनावट असल्याचे सांगताच तो पळत सुटला़ चौधरी यांनी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूला असलेल्या लोकांनी पाठलाग करुन त्याला पकडले़ हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात दिले़ चौधरी यांच्याकडील एक आणि शेख याच्या कडील इतर ४ अशा ५०० रुपयांच्या ५ नोटा पोलिसांनी जप्त केल्या़ हिंजवडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत या नोटा दाखविल्या असता त्या बनावट असल्याचे तेथील मशीनवर तपासणीनंतर स्पष्ट झाले़ नाशिक येथील सिक्युरिटी प्रेस रिपार्ट येथे तपासणीसाठी या नोटा पाठविण्यात आल्या़ त्या बनावट असल्याचा अहवाल तेथून आला़
या खटल्यात सरकारी वकील विकास शहा यांनी ४ साक्षीदार तपासले़ सिक्युरिटी प्रेसचा अहवाल हा महत्वाचा पुरावा ठरला़ न्यायालयाने शेख याला दोषी ठरवत बनावट नोटा चलनात वापरणे या कलम ४८९ खाली ७ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंड तसेच बनावट नोटा बाळगण्याप्रकरणी ५ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़.