बनावट डिग्री विद्यापीठाबाहेरून

By Admin | Updated: May 31, 2014 07:24 IST2014-05-31T07:24:00+5:302014-05-31T07:24:00+5:30

पुणे विद्यापीठाची बनावट पदवी प्रमाणपत्रे तयार करून (डिग्री सर्टिफिकेट) त्याची विक्री करणारे रॅकेट अस्तित्वात असल्याची शक्यता विद्यापीठातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीने व्यक्त केली होती

Fake degrees outside the university | बनावट डिग्री विद्यापीठाबाहेरून

बनावट डिग्री विद्यापीठाबाहेरून

पुणे : पुणे विद्यापीठाची बनावट पदवी प्रमाणपत्रे तयार करून (डिग्री सर्टिफिकेट) त्याची विक्री करणारे रॅकेट अस्तित्वात असल्याची शक्यता विद्यापीठातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीने व्यक्त केली होती. तसेच विद्यापीठाने याबाबत पोलिसांकडे तक्रार द्यावी, अशी शिफारसही केली आहे. त्यानुसार विद्यापीठातर्फे येत्या आठवडाभरात याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली जाणार असल्याचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी सांगितले. बनावट डिग्री तयार करणार्‍या व्यक्ती विद्यापीठातील नसून विद्यापीठाबाहेरील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सिंगापूर येथील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळविणार्‍या काही कर्मचार्‍यांनी पुणे विद्यापीठाचे बनावट पदवी प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती निदर्शनास आली होती. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने विद्यापीठाला सादर केलेल्या अहवालावर नुकत्याच झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत (बीओई) सविस्तर चर्चा झाली. तसेच या प्रकरणाचा तपास पोलिसांकडे द्यावा, असा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, परीक्षा मंडळाच्या बैठकीचा अंतिम इतिवृत्तांत मंजूर झाल्यानंतर विद्यापीठातर्फे येत्या आठवडाभरात बनवट डिग्री बाबतची तक्रार पोलिसांकडे दिली जाणार आहे. सिंगापूर शासनाकडून विद्यापीठाकडे तपासणीसाठी प्राप्त झालेल्या बनावट पदवी प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ही प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी बनावट शिक्के, माजी कुलगुरूंच्या बनावट स्वाक्षर्‍या आणि पूर्णपणे वेगळा मजकूर वापरण्यात आला असल्याचे निदर्शनास आले. विद्यापीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विद्यापीठाच्या नावाची बनावट डिग्री तयार करणार्‍या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठातील अधिकार मंडळाच्या सदस्यांनी हा तपास पोलिसांकडे देण्याचे सुचविले आहे. डॉ. गाडे म्हणाले, सध्या पदवी प्रमाणपत्र बाहेरून तयार करून घेतली जात असली तरी आता सर्व प्रमाणपत्रे विद्यापीठ आवारातच तयार करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरील व्यक्तींना विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्रे तयार करता येणार नाहीत. (प्रतिनिधी)

Web Title: Fake degrees outside the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.