छेडछाडीच्या गुन्ह्यांकडे होतेय डोळेझाक
By Admin | Updated: January 20, 2015 00:47 IST2015-01-20T00:47:09+5:302015-01-20T00:47:09+5:30
महिलांशी संबंधित गुन्ह्यांकडे पोलीस संवेदनशीलपणे पाहत नाहीत. अनेकदा महिलांच्या तक्रारी ‘टेक्निकल’ असल्याचे सांगून गुन्हे दाखल करण्याचे टाळण्यात येते.

छेडछाडीच्या गुन्ह्यांकडे होतेय डोळेझाक
लक्ष्मण मोरे ल्ल पुणे
महिलांशी संबंधित गुन्ह्यांकडे पोलीस संवेदनशीलपणे पाहत नाहीत. अनेकदा महिलांच्या तक्रारी ‘टेक्निकल’ असल्याचे सांगून गुन्हे दाखल करण्याचे टाळण्यात येते. त्यामुळे संवेदनशीलपणे पाहिले जावे आणि गुन्ह्यांचा तपास पारदर्शकपणे व्हावा, याकरिता तपास अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकाऱ्याने काम पहावे तसेच फिर्यादही महिला अधिकारी किंवा महिला कर्मचाऱ्यानेच घ्यावी, असा कायदा असतानाही महिला अधिकारी मात्र महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये उदासीन असल्याचे भोसरी येथे घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षात छेडछाडीच्या तब्बल ६० घटना पोलीस दरबारी दाखल झाल्या असून, महिलांच्या अपहरण आणि पळवून नेल्याच्या ८७ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
बसथांब्यावर, बसमधून प्रवास करताना, शाळा-महाविद्यालयांचे आवार आणि त्याच्या बाहेर तसेच रस्त्यावरून चालताना आणि कधी कधी घरामध्येही लहान मुली, तरुणी, महिलांना छेडछाडीच्या घटनांचा सामना करावा लागतो. टवाळांची दहशत आणि बदनामीच्या भीतीमुळे तक्रार द्यायला फारच कमी महिला समोर येतात. ज्या हिंमत करून समोर येतात, त्यांना पोलीस बदनामीची भीती घालून तक्रार देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या अभिलेखावरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी दाखविण्यासाठी पोलिसांकडून ‘समुपदेशन’ करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे महिलांना त्रास देणाऱ्यांचे मनोबल वाढत चालले आहे. रोडरोमिओंच्या या दहशतीमुळे अनेक मुली शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच तरुणी नोकरीवर जाण्याचे बंद करतात. याचा मानसिक त्रास असह्य झाल्यानंतर अनेक तरुणी, मुली आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. या घटनांकडे पोलीस केव्हा संवेदनशीलपणे पाहणार, हा प्रश्न आहे.
भोसरी येथील नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घेण्यात पोलिसांनी दाखविलेली दिरंगाई आणि विशेषत: महिला पोलीस उपनिरीक्षकाने दाखविलेली उदासीनता या मुलीच्या जिवावर बेतली. कुठूनही न्याय मिळत नाही म्हटल्यावर या मुलीने गळफास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा शेवटी मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलिसांवर टीका होत आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याची आणि नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांची भूमिकाच या घटनेत संशयास्पद आहे. महिलांविषयीच्या गुन्ह्यांमध्ये खरे तर खूपच संवेदनशीलता दाखविण्याची आवश्यकता आहे.
गेल्या वर्षभरात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, नातेवाइकांकडून छळ अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत चालली आहे. अर्थात, गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. ही बाब प्रशंसनीय असली, तरीदेखील न दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणही तेवढेच अधिक असणार आहे.
मुली, तरुणी आणि महिलांमध्ये वाढत्या छेडछाडीच्या तसेच बलात्काराच्या घटनांमुळे असुरक्षिततेची भावना दृढ होऊ लागली आहे. याला पुरुषी मानसिकता जेवढी जबाबदार आहे, तेवढीच महिलांची सहनशक्तीही कारणीभूत आहे. रस्त्याने जर एखाद्या महिलेसोबत गैरकृत्य घडत असेल, तर केवळ बघ्याची भूमिका न घेता अन्य महिलांनी एकत्र येऊन त्याला प्रतिबंध करायला हवा. जी गोष्ट आपली बहीण, पत्नी, आईसोबत घडू नये, असे पुरुषाला वाटते तीच गोष्ट तो दुसऱ्या महिलेसोबत कसा करू शकतो? पुरुषांनीही अन्य स्त्रियांरडे आदराच्या भावनेने पाहणे गरजेचे आहे.
- एक गृहिणी
भोसरीमध्ये घडलेल्या घटनेत मुलीला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर मुलीचे प्राण वाचले असते. अंमलबजावणी झाली नाहीत, तर कायदे केवळ कागदावर राहतील व अत्याचारांमध्ये वाढ होत जाईल.
- अॅड. अस्मा खान