बाह्यवळणाची कामे प्रलंबित; टोलनाका सुरू

By Admin | Updated: March 16, 2017 01:58 IST2017-03-16T01:58:18+5:302017-03-16T01:58:18+5:30

खेड ते सिन्नर या दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणात खेड ते चाळकवाडी ४९.३ किमीचा रस्ता आहे. यापैकी बाह्यवळणाचे २६.९ किमीचे काम प्रलंबित

Extrusion work is pending; Tollaana continues | बाह्यवळणाची कामे प्रलंबित; टोलनाका सुरू

बाह्यवळणाची कामे प्रलंबित; टोलनाका सुरू

नारायणगाव : खेड ते सिन्नर या दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणात खेड ते चाळकवाडी ४९.३ किमीचा रस्ता आहे. यापैकी बाह्यवळणाचे २६.९ किमीचे काम प्रलंबित असताना तसेच बाधित शेतकऱ्यांना संपादित क्षेत्राचा पूर्ण मोबदला अद्याप मिळालेला नाही. असे असतानादेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार यांनी संगनमत करून टोलनाका दि़ २१ फेब्रुवारीपासून सुरू केला आहे़
टोलनाका सुरू झाल्यानंतर बाह्यवळणाचे काम संथ गतीने सुरू आहे़ अधिकाऱ्यांनी खेड ते सिन्नर दरम्यानचे काम ७५ टक्के पूर्ण दाखवून दोन टोलनाके सुरू केले आहेत़ वास्तविक पहिल्या टोलनाक्याचे काम ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात प्रलंबित असताना चाळकवाडी येथील सुरू केलेला टोलनाका हा बेकायदेशीररीत्या सुरू केल्याची जुन्नर तालुक्यातील नागरिकांची तक्रार आहे़ सुरू करण्यात आलेला चाळकवाडी येथील टोलनाका बाह्यवळणाचे काम पूर्ण होईपर्यंत बंद करण्यात यावा व आजतागायत वसूल केलेला टोल शासनाकडे जमा करण्यात यावा, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.
राष्ट्रीय राजमार्ग क्र. ५० मधील चौपदरीकरणाचे काम खेडपासून (किमी ४२) ते सिन्नर (किमी १७७) असा १३७.४२ किमीच्या रस्त्याचे रुंदीकरण व ४ लेन बनवण्याचे काम एनएचडीपी भाग ४ अंतर्गत ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करणे’ या तत्त्वानुसार करण्यात आलेले आहे़
रस्त्याच्या कामासंदर्भात झालेल्या अटी व शर्तींमध्ये टोलनाक्याचे अंतर तडजोडीनुसार ६० किमी अंतरावर करण्यात आले आहे़ चाळकवाडी येथील टोलनाक्याला अनेकांचा विरोध होता़ हा टोलनाका बोटाखिंडीमध्ये हलविण्यात यावा, अशी मागणी होती़ परंतु नगर किंवा कल्याणकडे जाणाऱ्या वाहनांना केवळ ५ ते १० किमीसाठी नाहक टोलचा भुर्दंड पडला आहे़
नगर-कल्याण भागातून जुन्नर तालुक्यातील येणाऱ्या वाहनांनादेखील नाहक टोल द्यावा लागणार आहे़ चाळकवाडी येथील टोलनाक्यातून जुन्नर तालुक्यातील वाहनांसाठी टोल आकारणी केली जात नसली तरीही जुन्नर तालुक्यात येणाऱ्या जड वाहनांना तसेच पाहुण्यांना नाहक टोलचा भुर्दंड पडत आहे़ चाळकवाडी येथे सुरू करण्यात आलेला टोल हा अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रलंबित कामे असताना व केंद्र शासनाला चुकीची माहिती सादर करून टोल सुरू करण्यात आला आहे़ मनसेचे उपजिल्हा प्रमुख मकरंद पाटे तसेच सामाजिक कार्यकर्ते डी़ बी. वाळुंज यांनी चाळकवाडी येथील चुकीच्या टोल आकारणीबद्दल उच्च न्यायालयात जनहिताची याचिका दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे़ या टोलनाक्यापासून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, असे सांगण्यात येते होते़ मात्र, प्रत्यक्षात स्थानिक रोजगार तर लांबच, या टोलनाक्यामुळे अनेकांची घरे, व्यवसाय संपुष्टात आले आहेत़
स्थानिक रोजगार उपलब्ध करून देऊ, असा भुलभुलय्या करून स्थानिकांना रोजगार देण्यास लागू नये व टोलनाक्यास विरोध होऊ नये म्हणून प्रशासनाने आचारसंहितेच्या काळात म्हणजेच दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मध्यरात्री टोलनाका सुरू केला.

Web Title: Extrusion work is pending; Tollaana continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.