परदेशी प्राणी, पक्ष्यांची नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ- वन विभागाकडे माहिती सादर करणे बंधनकारक; १५ मार्चपर्यंत कालावधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:09 IST2021-01-18T04:09:33+5:302021-01-18T04:09:33+5:30
भारतात तस्करीच्या मार्गाने आयात होणाऱ्या विदेशी प्राण्यांच्या अवैध व्यापाराला अटकाव व्हावा यासाठी गतवर्षी जून महिन्यात याबाबतचे आदेश काढले होते. ...

परदेशी प्राणी, पक्ष्यांची नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ- वन विभागाकडे माहिती सादर करणे बंधनकारक; १५ मार्चपर्यंत कालावधी
भारतात तस्करीच्या मार्गाने आयात होणाऱ्या विदेशी प्राण्यांच्या अवैध व्यापाराला अटकाव व्हावा यासाठी गतवर्षी जून महिन्यात याबाबतचे आदेश काढले होते. त्यानुसार परदेशी प्राणी, पक्षी पाळणाऱ्यांना आपल्याकडील प्राणी, पक्ष्यांची माहिती द्यावयाची होती. ती मुदत गतवर्षी संपली होती. पण त्यात वाढ केली आहे. पोपट, लव्हबर्ड्स, गोड्या पाण्यातील कासव, मार्मोसेट किंवा आफ्रिकन ग्रे पोपट यांसारख्या परदेशी प्राणी, पक्ष्यांबाबत हा आदेश आहे. राज्याच्या प्रधान मु्ख्य वनसंरक्षकांकडे (वन्यजीव) या प्राण्यांची नोंद करावयाची आहे. भारतात सीमाशुल्क कायद्यात परदेशी प्राण्यांच्या आयातींच्या नियमांचा समावेश आहे. या परिस्थितीत गैरमार्गाने तस्करीच्या स्वरूपात हे परदेशी प्राणी भारतात आणले जातात. त्यांच्या व्यापार आणि पाळणाऱ्यांकडून याबाबत नोंद होत नाही. अशा गोष्टींवर रोख लावण्यासाठी केंद्राने हा आदेश काढला आहे. अगोदर डिसेंबर २०२० पर्यंत ही मुदत होती. ती वाढवून आता १५ मार्च २०२१ केली आहे.
------------------------
यावर मिळेल माहिती
या नोंदी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या 'परिवेश' (http://parivesh.nic.in/) या संकेतस्थळावरुन करता येईल.
संकेतस्थळावरील 'एक्सझाॅटिक लाईव्ह स्पिसिज' या लिंकवर जाऊन परदेशी प्रजातींची नोंद करता येईल. या माहितीची तपासणी राज्याच्या 'प्रधान मुख्य वनसंरक्षक' (वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक वन अधिकाऱ्यांकडून होणार आहे.
------------------------
केंद्राने परदेशी प्राणी, पक्षी यांची नोंद करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या वन विभाग कार्यालयात याविषयी माहिती द्यावी.
- रमेशकुमार, प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) पुणे विभाग