अणुचाचण्यांमुळेच असुरक्षितता
By Admin | Updated: February 4, 2015 00:29 IST2015-02-04T00:29:21+5:302015-02-04T00:29:21+5:30
जगात शांतता नांदण्याऐवजी असुरक्षितता वाढीस लागली आहे. यामागचे प्रमुख कारण हे अणुचाचण्या आहे. शत्रुराष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी अनेक देशांनी अणुचाचण्या घेतल्या.

अणुचाचण्यांमुळेच असुरक्षितता
पुणे : जगात शांतता नांदण्याऐवजी असुरक्षितता वाढीस लागली आहे. यामागचे प्रमुख कारण हे अणुचाचण्या आहे. शत्रुराष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी अनेक देशांनी अणुचाचण्या घेतल्या. यामधून अणुचाचण्या घेण्याची स्पर्धा निर्माण झाली आणि कोणताही देश कोणावरही अण्वस्त्र डागू शकतो, ही भीती निर्माण झाली असून, ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, असे मत भाभा अॅटोमिक एनर्जीतील माजी अधिकारी व अणुशास्त्रज्ञ प्रकाश बुरटे यांनी व्यक्त केले.
अणुविध्वंसविरोधी समितीच्या वतीने आज ‘अण्वस्त्रमुक्त जग शक्य आहे’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी आरोग्य सेनेचे डॉ. अभिजित वैद्य, लोकायतचे नीरज जैन व्यासपीठावर उपस्थित होते. बुरटे म्हणाले, विसाव्या शतकात अण्वस्त्रे निर्माण करण्यात आली आणि पहिल्या ५० वर्षांत जगाला अस्थिरतेकडे नेण्याच्या घटना घडल्या. अमेरिका आणि रशियाने एकमेकांना शह देण्यासाठी अण्वस्त्रांची निर्मिती केली. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अण्वस्त्रे टाकली आणि यात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. यावरून याची दाहकता लक्षात आली. मात्र, त्यानंतरही शत्रुराष्ट्रांना शह देण्यासाठी अनेक राष्ट्रांनी अण्वस्त्रांची निर्मिती केली. यामुळे १९८५ मध्ये जगात तब्बल ६७ हजार अण्वस्त्रे झाली. या अण्वस्त्रांच्या तपासणीसाठी स्फोट घडवून आणल्याने जगाच्या बहुतांशी भागात त्याचे किरणोत्सार पोहोचले. या अण्वस्त्रे निर्माण करण्याच्या स्पर्धेमुळे अनेक राष्ट्रांमधील शत्रुत्व वाढत गेले आणि असुरक्षिततेची भावना वाढीस लागली. याचे गंभीर परिणाम समोर येऊ लागल्याने अण्वस्त्रमुक्त जग ही संकल्पना समोर आली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर युनोच्या माध्यमातून ती साकारण्यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. यात अनेक देशांनी भाग घेतला. मात्र भारतासह अजूनही काही देश अण्वस्त्रमुक्त होण्यास तयार नाहीत. असे असतानाही २०१३ पर्यंत जगातील अण्वस्त्रांची संख्या ६७ हजारांवरून १७ हजारांपर्यंत खाली आली. यातील ७ हजार अण्वस्त्रे काही महिन्यांमध्ये आणखी कमी होतील, असे मत बुरटे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
४जगाला खरोखरच अण्वस्त्रमुक्त करायचे असेल, तर सर्व देशांमधील नागरिकांनी सरकारवर यासाठी दबाव आणायला हवा. अमेरिके तील नागरिकांनी रस्त्यावर उतरत अण्वस्त्रे कमी करण्याची जोरदार मागणी केली. यामुळे अमेरिकेचे सरकार झुकले आणि ते कमी करण्यास सुरुवात केली.
४अशा पद्धतीने भारतासह सर्व देशांमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून अण्वस्त्रमुक्त देशाची मागणी केली तर प्रत्येक सरकार झुकेल आणि हे शक्य होईल, असे मत बुरटे यांनी व्यक्त केले.