शहरात कामगारांची होतेय पिळवणूक
By Admin | Updated: August 14, 2014 04:32 IST2014-08-14T04:32:06+5:302014-08-14T04:32:06+5:30
औद्योगिक क्षेत्रात कामगारांची संख्या कमी झाली आहे. कारखान्यांमध्ये कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेतले जात आहे.

शहरात कामगारांची होतेय पिळवणूक
संजय माने, पिंपरी
औद्योगिक क्षेत्रात कामगारांची संख्या कमी झाली आहे. कारखान्यांमध्ये कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे कामगारांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो आहे. औद्योगिक परिसरातील काही कारखाने बंद झाले, काही स्थलांतरित झाले. त्याची झळ कारखान्यांमध्ये सध्या काम करणाऱ्या कामगारांना सोसावी लागत आहे. त्यांच्याकडून क्षमतेपेक्षा अधिक काम करून घेतले जात असल्याने पिळवणूक होऊ लागली आहे. रोजगाराचा पर्याय हाती नसल्याने परिस्थितीशी नाइलाजाने जुळवून घेण्याशिवाय कामगारांपुढे गत्यंतर नाही. कंपनीत अनेक वर्षे काम करणाऱ्या कायम कामगारांना सहा महिन्यांसाठी नेमल्या जाणाऱ्या कामगारांची मदत व्हायची. आयटीआयमधून बाहेर पडल्यानंतर कंपनीत प्रशिक्षणासाठी (अप्रेंटिसशिप) येणाऱ्या विद्यार्थ्यांची मदत व्हायची. आता हंगामी कामगार अत्यल्प झाल्याने कायम कामगारांनाही अतिरिक्त काम करणे भाग पडू लागले आहे.
औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांवर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांनाही झळ बसली आहे. कारखान्यांच्या परिसरातील कॅन्टीन व्यवसाय अडचणीत आला आहे. चहा, नाष्ट्याच्या टपऱ्या परिसरातून हद्दपार झाल्या आहेत. या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या हातचा रोजगारसुद्धा हिरावला आहे.
ग्रार्इंडिंग, ब्लास्टिंग, वेल्डिंग कामे करून देणारी छोटी वर्कशॉप संकटात आहेत. हार्डवेअरच्या व्यवसायावरसुद्धा परिणाम झाला आहे. मालवाहू टेम्पो एमआयडीसीत ठिकठिकाणी उभे केलेले दिसून येतात. दिवसभरात त्यांच्या वाट्याला एखाद-दुसरी ट्रिप येते. ज्या वर्कशॉपमध्ये चार ते पाच कामगार होते. त्या ठिकाणी कामगारांची संख्या दोन वा एकवर आली आहे. पूर्वी वेल्डरला वेल्डरचे काम मिळत होते. मदतीला हेल्पर असे. आता वेल्डरला स्वत:लाच वेल्डिंगच्या कौशल्याच्या कामाबरोबर हेल्परचेसुद्धा काम करणे भाग पडत आहे. औद्योगिक परिसरात नोकरी मिळण्याची परिस्थिती बिकट बनल्याने कामगारांना अन्य ठिकाणी सहज नोकरी मिळत नाही. या परिस्थितीचा फायदा घेऊन कंपन्या कामगारांना वेतनवाढ टाळतात. वर्षानुवर्षे आहे त्याच पगारात त्यांना काम करणे भाग पडते आहे.
औद्योगिक क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत आहे. कंत्राटी पद्धतीच्या विरोधात, कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी कामगार संघटना आंदोलन करतात. मात्र कमी मनुष्यबळात काम करून घेण्याचे प्रकार वाढले असून, कामगारांवर अतिरिक्त कामाचा ताण पडतो. या विषयी कामगार संघटनांनी आवाज उठवावा, अशी अपेक्षा कामगारवर्गाकडून व्यक्त होत आहे.