गुरुवारपासून मिळणार दिवसाआड पाणी
By Admin | Updated: July 15, 2014 04:03 IST2014-07-15T04:03:00+5:302014-07-15T04:03:00+5:30
पिंपरी-चिंचवडकरांना १७ जुलैपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पवना धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे

गुरुवारपासून मिळणार दिवसाआड पाणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांना १७ जुलैपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पवना धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात अनिवार्य असल्याने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे महापालिकेला भाग पडले आहे. प्रभागनिहाय पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असून पिण्याचे पाणी अन्यत्र वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी दिली.
महापौर मोहिनी लांडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त म्हणाले, ‘‘पावसाने ओढ दिली आहे. जून महिना कोरडा गेला. जुलै महिना अर्धा झाला, तरीही पाऊस आलेला नाही. पवना धरण क्षेत्रातही पाऊस नसल्याने यापुढील काळात पाण्याचा काटकसरीने वापर करणे क्रमप्राप्त आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याबाबत २३ जूनला झालेल्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला असता १८.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. पवना धरणातून होणारा दररोज विसर्ग विचारात घेता हा साठा ३० आॅगस्टपर्यंत पुरेल एवढाच होता. महापालिकेने २ जुलैपासून दिवसातून १ वेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन केले. त्यानंतरही पाऊस झाला नाही. आजअखेरीस पवना धरणामध्ये केवळ १२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या वर्षी आजअखेरीस धरण परिसरात अवघा १५५ मिलीमीटर पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक सोमवारी झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)