शासनाच्या प्रत्येक खात्याची, योजनांची फेरतपासणी झालीच पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:47+5:302021-02-05T05:06:47+5:30
नारायणगाव : शासनाच्या प्रत्येक खात्याची व योजनांची फेरतपासणी झाली पाहिजे. ही तपासणी करून आढावा घेतल्यास त्या संस्थेचा ताळेबंद समजू ...

शासनाच्या प्रत्येक खात्याची, योजनांची फेरतपासणी झालीच पाहिजे
नारायणगाव : शासनाच्या प्रत्येक खात्याची व योजनांची फेरतपासणी झाली पाहिजे. ही तपासणी करून आढावा घेतल्यास त्या संस्थेचा ताळेबंद समजू शकतो, असे प्रतिपादन पाटोदा (जि. औरंगाबाद) ग्रामपंचायतीचे माजी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले.
नारायणगाव ग्रामपंचायत व समविचारी प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पेरे पाटील प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे होते. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर , राजगुरूनगर बँकेचे संचालक किरण मांजरे, पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर, बाळासाहेब पाटे, उपसरपंच सारीका डेरे, समविचारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वारुळे, उपाध्यक्ष आशिष माळवदकर, सचिव राखी रत्नपारखी, हर्षल मुथ्था, ग्रा प सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, संतोष पाटे, गणेश पाटे, राजेश बाप्ते आदी उपस्थित होते.
दरम्यान, भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते वारुळवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव, गुंजाळवाडी, खोडद, निमदरी, येडगाव, आर्वी, मांजरवाडी , धनगरवाडी, उदापूर येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
पेरे पाटील म्हणाले की, महात्मा गांधींची खेड्याकडे चला ही संकल्पना सर्वांनीच आत्मसात करून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी एकोप्याने प्रयत्न करायला हवे, पिण्याचे पाणी स्वच्छ वापरले पाहिजे, सांडपाणी जमिनीत जिरविले पाहिजे किंवा पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा राबविली पाहिजे. मुलांना योग्य शिक्षण दिले जावे. झाडे लावली पाहिजे, अनाथांना, निराधार व्यक्तींना मोफत जेवण दिले पाहिजे. झाडे लावा-झाडे जगवा. हा मोलाचा संदेश त्यांनी या वेळी दिला.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी आपल्या कार्यकाळातील ग्रामपंचायतीसाठी कामधेनू योजना राबविल्यामुळे ग्रामस्थांना काय फायदा झाला हे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत कोल्हे, राखी रत्नपारखी यांनी केले. आभार सरपंच योगेश पाटे यांनी मानले.
३१नारायणगाव
आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भास्करराव पेरे पाटील.