नैतिकताही शिक्षणातून समजू शकेल
By Admin | Updated: August 17, 2015 02:20 IST2015-08-17T02:20:34+5:302015-08-17T02:20:34+5:30
अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमात व्यावसायिकता नैतिकता या विषयांचा समावेश झाला पाहिजे. एखाद्याचे वागणे नैतिक आहे की अनैतिक आहे

नैतिकताही शिक्षणातून समजू शकेल
पुणे : अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमात व्यावसायिकता नैतिकता या विषयांचा समावेश झाला पाहिजे. एखाद्याचे वागणे नैतिक आहे की अनैतिक आहे हे शिक्षणामधून समजले गेले पाहिजे, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
बिझनेस एथिक्स फाउंडेशनच्या वतीने संपादित करण्यात आलेल्या ‘बिझनेस एथिक्स-टुडे अँड टुमारो’ या पुस्तकाचे प्रकाशन भटकर यांच्या हस्ते रविवारी झाले. मराठा चेंबरच्या पद्मजी सभागृहात हा कार्यक्रम झाला. या पुस्तकामध्ये २१ लेखांचा समावेश असून त्यांचे संपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. व्ही. बापट आणि डॉ. ए. एम. जोशी यांनी केले आहे. या वेळी उद्योगपती प्रमोद चौधरी, नारायण मुळे आदी उपस्थित होते.
भटकर म्हणाले, ‘‘आपल्या प्राचीन कर्मसिद्धांतामध्ये जे सांगितले आहे, त्यांचा विचार करायला पाहिजे. तुम्ही जे कर्म करता ते तुम्हाला भोगावे लागते. ही जाणीव जर आपण निर्माण करून दिली तर व्यवसायामध्ये नैतिकता येऊ शकते.’’ चौधरी म्हणाले, ‘‘व्यवसायामध्ये नैतिकता राहिलेली नाही. कारण सगळे स्वत:चा विचार करतात. व्यवसाय करताना जे नियम घातले जातात त्यांचा अतिरेक होता कामा नये आणि नियमसुद्धा पूर्ण करता येतील, असे असावे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल.(प्रतिनिधी)